दादा गावंड यांची कविता (अनुवाद)

Started by विक्रांत, February 12, 2025, 04:12:22 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दादा गावंड यांची कविता (अनुवाद)
*******************
मन हे भटकते तया भटकू दे
राहुनिया शांत तया पाहून घे ॥१

बाहेर धावून करी ते व्याकूळ   
परी स्तब्ध रहा अंतरी निश्चळ ॥२

राहू वाहू दे हे मन नि विचार
व्यस्त सदोदित आणीक अपार  ॥३

जाणीव निश्चल अलिप्त नि शांत
आपुलिया आत सदा अखंडित ॥४

सौर्य मंडलास सदैव भ्रमण
सूर्य  परी राही ढळल्या वाचून ॥५

धावू दे इंद्रिय इंद्रियाच्या अर्थी
होवो कासावीस मन मेटाकुटी ॥६

परंतु ती ऊर्जा असू दे अलिप्त
धावू देत मन निरखी त्या शांत ॥७

फुटतात लाटा अनंत वरती
अंतरी सागरा गांभीर्य नि शांती ॥८

भटकती मेघ सर्व जगतात
परी आकाश ते पवित्र निस्तब्ध ॥९

घटती घटना घडो जीवनात
राही अंतरी तू सावध निवांत ॥१०

बडबडे मन सदैव बेशिस्त
ठेव आकलन शांत मी दुरस्थ ॥११

प्रखर प्रदग्ध पाहणे घडता 
शांती व नम्रता उलगडे चित्ता ॥१२

अरे तू आकाश असीम अनंत
नच पसरले मेघ अस्ताव्यस्त ॥१३

सावध सुधीर संवेदनशील
आहेस तू साक्षी तुच जाणशील ॥१४

क्षणिक स्मृती नि क्षणिक विचार
नाहीस रे तू जाण हे साचार ॥१५

सखोल गंभीर प्रचंड सागर
तरंग ना तू जो दिसे वरवर ॥१६

असेअविचल सूर्य तू महान
नच उपग्रह विचार भ्रमण ॥१७

तूच तूच आत शाश्वत नि स्थिर
विनाशी ढसाळ दिसे जै बाहेर ॥१८

अनंत अव्याप्त असा जो शाश्वत
अजन्मा प्राचीन असा तू रे फक्त ॥१९

तत तत्व असी तूच असे तो रे
तत तत्व असी तूच असे तो रे ॥२०

तुझ्यातील ते हे सदा तुझे व्हावे
जाणीवी जाणीव सारे उजळावे ॥२१

कालाच्या अतीत दिव्य अनुभूती
अक्षय अवीट यावी तुझे हाती ॥२२

मूल्यवान अशी घटिका ही आहे
मूल्यवान क्षण आताचाच आहे ॥२३

करी हे चिंतन धरी रे तू ध्यान
घेई तू जाणून आपल्या आपण ॥२४

दिव्य ते आपले अंतर जाणून
शाश्वत नित्य घे स्वरूप पाहून ॥२५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com