बंधन

Started by विक्रांत, February 12, 2025, 04:40:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

बंधन
****
शब्दाच्या वाटेनं शब्दातिताच्या अंगणात
जाणं तेवढे सोपे नसतं
कारण आपल्याला शब्दाचा हात नाही सोडवत
दिसणारा प्रत्येक क्षण प्रत्येक घटना
प्रत्येक प्रसंग आपण बांधून टाकतो शब्दात
अन देतो  ठेवून त्यांना मेंदूच्या फडताळात
अगदी ओझे होईपर्यंत
त्याचा वापर पुनर्वापर याची पर्वा न करता
उपयुक्तता  निरुपयोगिता न ठरवता
 हजारो स्मृतींच्या या अंधारात
भर पडत असते सतत
इच्छा आणि अनिच्छे वाचून
 त्या ओझ्याखाली चिरडत असतं अस्तित्व
आणि एक दिवस अचानक कुणीतरी
आपल्याला शब्दांच्या चावीनेच
शब्दांच्या कुलुपातून त्या साखरदंडातून
अलगद सोडवत
बंध सुटल्यासारखी वाटतात ओझं कमी होतं
अन त्या सोडवणाऱ्या चावी बद्दल कृतज्ञता
येते दाटून मनात
पण मग ती चावीही टाकून द्यायची
ही कल्पना नाही सहन होत
अन आपण उभे राहतो शब्दाच्याच प्रांगणात
चावीने स्वतःला बंदिस्त करत कुलूप नसूनही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘ 🕉�