माझ्या जीवापाड प्रेम करणार्या हरवलेल्या आईस.... "माझी विनम्र श्रद्धांजली." “आई.

Started by charudutta_090, May 08, 2011, 04:01:56 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

"आई." ..........चारुदत्त अघोर.
जननी माझी तू,प्रतिमा तुझी साठवणी,
किती गं थांबवू मनास,येतात सारख्या आठवणी;
अशी कोणती तुला,झाली गं जायची घाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

तुझंच बोट पकडून,पहिलं पाउल चाललो,
तोतार्या शब्दी पहिले "आई"म्हणूनच बोललो;
थकलो आता मी,तुला शोधता पाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

उनाड लहानपणी,मार खाताना लपलो,
रात्री तुझ्याच हाथ-कुशीत,निर्धास्त झोपलो;
उब दिलीस तू,माया पदरा छाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

ठेचकाळलो कधी,तर तूच पुसले अश्रू,
तुझा पदराचा वास कसा मी विसरू?;
या उजेडी दुनियेत,उरली काळोखाची शाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

किती गं सहन केल्या,खोड्या तू माझ्या,
एकदा तर हाक दे म्हणून, ये रे माझ्या राज्या;
तुझ्या स्मरणांनी माझा, दाटून कंठ येई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

माझ्या विना कधी,घास नाही गीळलास,
चांगल्या शिकवणी तू, कान माझा पिळलास;
अझून त्या आठवणीने,कान लाल होई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

माझ्या तोंडून घास,आता नाही घेववत,
वेडावला तुझा मी,होतं तूच माझं दैवत;
तहानल्या जीवाची होती,तूच पाण-पोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

सगळे असलेतरी,आता तूच नाही,
काय होत कसं सांगू,काही समजत नाही;
तूच भेटावी वाटतं,जरी मी कुठे जाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

हे वरपांगी सुख,कसं मनी रुचवू,
तू नाही हे दुःख, कसं ग पचवू;
या हरवल्या पिल्लास,घे चरणा ठाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई...!

तुझ्यासारखी माया,नाही कुठेच भेटत,
जड झालं आयुष्य,आता नाही रेटत;
कसं पेलू जीवन,झालं जड डोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

ये न गं एकदा,घट्ट कुशीत पडू दे,
तुझ्या मांडी डोकावून,ढसा ढसा रडू दे;
जगी श्रीमंत मी,भिकारी तुझ्या विना माई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
चारुदत्त अघोर.



chetant087

"तुझ्या स्मरणांनी माझा, दाटून कंठ येई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!"

-खूपच हृदयस्पर्शी..



Saee