"क्षण"

Started by praffulbhorkar, July 09, 2011, 01:19:59 AM

Previous topic - Next topic

praffulbhorkar

असाच हा क्षण येतो मधुनी,
उलगडती पाने... झुरझुरत्या या मनी...
बिलगतो वारा अन् होते अशी मोहिनी,
बहरतो चाफा... ऐन गळण्याच्या क्षणी...!

शब्दांचं अडखळणं, तरी खूप काही सांगणं,
प्रश्नांचा साचतो ढीग... कळून देखील उत्तर टाळणं...
भिडता नजर एकमेकां, विषयाचं बदलणं,
चोरुनच का होईना... पण मन भरून पाहणं...!

आठवणींच्या महापुरात, मन जाते वाहून,
अलग असे स्मित उमटताच.. भान येई सावरून...
सरतो हा समय असा, भाव मात्र राही अडून,
थांबवायचे तरी कसे... हक्क केव्हाच गेलाय निसटून...!

पावले वळताच आपल्या वाटी, अंतर्मनाची होते लाही,
भेट केव्हा होईल पुन्हा... देता येणार नाही ग्वाही...
डुलकावत एक 'थेंब', 'तिनं' पुसण्याची वाट पाही,
मी म्हणालो 'वेड्या थेंबा'... ती आता तुझी राहिली नाही...!!


- प्रफुल्ल भोरकर

gaurig