माझे बाबा

Started by बाळासाहेब तानवडे, July 24, 2011, 01:31:39 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे



माझे बाबा

    बालपण फुलवल माझ, सुसंस्कारित केलं मन|
भाग्य माझं थोर लाभलात पिता तुम्ही  लक्ष्मण||
भरभरून दिलं सर्वांना,आपल्यात प्रेमाचाच गाभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||१||

लाभली तुम्हांस अपत्ये सद्गुणी जणू  नवरत्ने|
जीवनसाथी होती आनंदी,ना उतणे ना मातणे||
पसरल्या फांद्या दूरवर जणू तुम्ही  वटवृक्ष उभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||२||

अलौकिक होती बुद्धी,सोबत अथक कष्टांची  साथ|
शून्यातून विश्व निर्मिले,केले भावंडांचे  बळकट हात||
कर्तुत्व होते मोठे आपले, ना होता प्रगतीला  थांबा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||३||

होते मोठे विचार आपले , वाणी होती खुप शुद्ध|
बोलणं जणू साखर पेरणी,ऐकणारा होई  मंत्रमुग्ध||
सुधारित विचारांनी गाजल्या आपल्या उमेदीत  सभा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||४||

प्रयोग केले मातीत अनेक, उत्तम केली  शेती|
गुऱ्हाळाचा खेळ रंगवला,झाली दिगंत  कीर्ती||
जपानी भात शेतीचा दिला ,पंचक्रोशीला धडा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||५||

समाजकार्याची होती तुम्हांस कायम भारीच  आवड|
संसार सांभाळून सत्कार्यास काढली नेहमीच सवड||
भूषवून संस्थांत पदे विविध,दिला फक्त  न्यायच सदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||६||

तुम्ही छंद जपले खुप सारे जसे नवे अन्  जुने|
क्रिकेट,सिनेमा,लाठी-काठी अन् शिकारीस  जाने||
व्यायामास महत्व होते,मोडी भाषा तुम्हांवर  फिदा|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||७||


असे होता आपण बहुगुणी,सदगुणी, बहुश्रुत  व्यक्ती|
साऱ्या घरादाराची शक्ती , जनसामान्यांची  भक्ती||
होता तुमचा एकच मंत्र ," मिळेल यश खुप राबा"|
असे होते माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||८||

अध्यात्माचा होता ओढा,नित्य असे  हरिपाठाचा पाढा|
आषाढी एकादशी विठ्ठल आले, द्वादशी  वैकुंठी घेऊन गेले||
खात्री आहे वैकुंठी असेल आपल्यासवे  विठ्ठल तो उभा|
असे पावन झाले माझे अन् सर्वांचेच मोठे  बाबा||९||

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०७/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/ 

gaurig


बाळासाहेब तानवडे