संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, June 11, 2025, 09:56:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

'संत सेना यांच्या काव्याचे दर्शन' या लेखात रामचंद्र माधवराव शिंदे सेनाजीच्या काव्याचे मोठेपण व उंची सांगताना स्पष्ट करतात, "त्यांची शब्द योजना व कल्पनांची योजकता अचूक, समर्पक व चपखल व ज्ञानदेव तुकारामांच्या तोडीस तोड असल्याचे ठिकठिकाणी आढळून येते. हे शब्दसौंदर्य व शब्दचातुर्य अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक त्यांनी साध्य केले होते. हे निर्विवाद, मायमराठीशी स्वतः पूर्णत्वाने एकजीव होऊन परप्रांतीयत्व त्यांनी साफ पुसून टाकल्यांचा दाखला त्यांच्या उचित शब्दप्रयोगातून मिळतो. याची काही उदाहरणे पाहा. लेकुराची आळी, देहुडे ठाण सुकुमार आणि सोनियाचा दिवस, ही माझा मिराशी, शिणसी भरोवरी, विनंती सकळिकां, सांडोनि कीर्तन, हाचि माझा शकून व्यर्थ कासयासि, करी जतन ब्रीदावली, ऐसे वैष्णव डिंगर, जुनाट जुगादीचे, भावे । रिचा विठ्ठला शरण, भावनांचा लाहो, लौकिकाची चाड, सरता केला, चढधीचा उद्धार, दुजियाचा शाप, गोपिका वेल्हाळ कर्मचांडाळ, धर्माचं थोतांड इत्यादी अशा

प्रकारचे मार्मिक शब्दप्रयोग मराठी भाषेशी अल्पपरिचित असणाऱ्या परप्रांतीयाला अध्ययनाशिवाय सुचणे केवळ अशक्य आहे." (भालचंद्र खंड ५६, अ० क्र० १ १९९४)

 अमराठी मानल्या गेलेल्या संत सेनामहाराज यांनी मराठी कविता त्यांच्या मराठीपणाचा पुरावा देत, साक्ष देते, असे त्यांच्या विविधस्वरूपी काव्याच्या आधारे म्हणता येते. सेनामहाराज यांची कविता अस्सल मराठी भाषेत आहे. मराठी लोक जीवनातील दैनंदिन व्यवहारातील वापरलेले शब्द त्यांच्या कवितेत स्वाभाविकपणे आलेले आहेत. त्यांच्या कवितेची भाषा साधी, सोपी व सुबोध आहे. प्रासादिकता हा त्यांच्या काव्याचा एक लाक्षणिक गुण आहे. त्यांची संपूर्ण कविता अंतरीच्या जिव्हाळ्याचा, भक्तिभावाचा व अज्ञानी लोकांविषयीच्या वाटणाऱ्या तळमळीचा प्रत्यय देते.

जीवन चरित्र, जन्मस्थळ-

संत सेनामहाराज हे वारकरी संप्रदायातील संत मेळ्यातील एक संत असून, त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले

जाते. श्रीसंत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेनाज्जींचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, 'गुरुग्रंथसाहिब' या पवित्र ग्रंथात संत सेनाजींच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.

संत सेनारजींच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता (रचना) आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय स्वामी रामानंदांचे शिष्यत्व त्यांना लाभल्याने त्यांच्या जन्मठिकाणाबाबत एकमत व्यक्त करणे अवघड वाटते.

महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील अनेक संशोधक अभ्यासकांच्या मते संत सेनामहाराज हे महाराष्ट्रीय संत होते, याचा ते आवर्जून उल्लेख करतात. त्या संदर्भात काही मते पुढीलप्रमाणे आहेत.

'उत्तर भारत की संत परंपरा' या आपल्या ग्रंथात आचार्य परशुराम चतुर्वेदी म्हणतात की, 'मराठी वा हिंदी या दोन्ही साहित्याच्या परिशीलनातून आपल्याला असे म्हणता येईल की, संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेलेले होते, तत्पूर्वी ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. महाराष्ट्रात राहून त्यांनी अभंगरचना केली असावी. प्रसंगानुसार ते नंतर उत्तरेकडे गले असावेत. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेनानी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांची सेवा केलेली आहे

महाराष्ट्रातील संत नामदेव शिष्या संत जनाबाईच्या अभंगांमध्ये सेनाजींचा केवळ उल्लेखच नाही, तर त्यांच्या जीवनकथेवर एक अभंग रचला आहे. काही संशोधकांच्या मते हा अभंग प्रक्षिप्त असावा; परंतु तो प्रक्षिप्त नसेल तर संत सेना हे नामदेव समकालीन व महाराष्ट्रीय संत होते, याला पुष्टी मिळते.

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-11.06.2025-बुधवार.
===========================================