संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, June 13, 2025, 10:49:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

श्रीसकलसंतगाथा' संपादक जोशी (आवटेप्रत ) यात ह० भ० प० नाना- महाराज साखरे यांनी महाराष्ट्रीय नामदेवकालीन संतांमध्ये सेनाजींचा समावेश केला आहे.

डॉ अशोक कामतांनी सेनाजी हे अव्वल महाराष्ट्रीय संत होते, असे आग्रहाने सांगितले आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ ते सांगतात, "मराठी संतांच्या रचनेमध्ये सेनाजींनी अधिक अभंग लिहिले आहेत. ते आज उपलब्ध आहेत. अशा रचना करणारा संत निश्चित महाराष्ट्रीय असावा." असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

भा० पं० बहिरट/भालेराव यांनी आपल्या 'वारकरी संप्रदाय : उदय व विकास' या ग्रंथात भागवत धर्ममंदिरांची द्वारे सर्व जातिजमार्तींसाठी खुली होती. असे सांगताना म्हणतात, "सर्व जमातीतून श्रेष्ठ संताची श्रेणीच निर्माण झाली. ज्ञानदेवांच्या प्रभावळीत विलसू लागली. या प्रभावळीत गोरोबा कुंभार, सांवता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, परिसा भागवत, जनाबाई, चोखामेळा व त्यांची बायको सोयराबाई आणि मुले, वेश्या कुळातील कान्होपात्रा इत्यादी संतांची मांदियाळी आपल्या अमृतमय अभंग वाणीतून भक्तिरसाचे पाट पाझरू लागले."

भा० पं० बहिरटांच्या वरील संदर्भावरून सेनाजी हे केवळ नामदेव समकाली नव्हते तर ते महाराष्ट्रीय होते, असे स्पष्ट मत दिसून येते. माधवराव सूर्यवंशी 'सेना म्हणे' या ग्रंथात म्हणतात, "सेना न्हावी यांची उपलब्ध अभंगरचना मराठीत आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाची निदर्शक नाही काय ? सेना न्हावी हे हिंदी भाषक असते, तर त्यांच्या मराठी अभंगरचनेवर हिंदीचे संस्कार अवश्य उमटले

असते. तसे संस्कार त्यांच्या मराठी अभंगावर पुसट स्वरूपात तरी आढळतात काय ? नामदेव महाराष्ट्रीय असले तरी त्यांचे शिष्य उत्तरभारतात सापडतात. तेव्हा उत्तर भारतीय अनुयायी असणे ही गोष्ट सेना न्हावी महाराष्ट्रीय असण्याला बाधक। ठरते काय?" सेना पूर्णतः महाराष्ट्रीय व मराठी भाषकच असल्याचे प्रकनि त्यांच्या अभंग रचनेवरून स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे सेनाजी मराठी भाषेशी, मराठी मातीशी इतके समरस झालेले दिसून येतात की मराठी मनामध्ये त्यांच्या बाबत परप्रांतीयत्वाची परभाषकत्वाची कसलीच शंका पुसटशी सुद्धा येत नाही. म्हणूनच त्याच्या अभंगातील गवळणींमधील शब्दरचनाही मराठमोळ्या घाटणीची असल्याचे प्रकर्षाने जाणवते. (पृ० क्र० ४२) असा प्रतिप्रक्न माधवराव सूर्यवंशींनी विचारला आहे. ते महाराष्ट्रीयच आहेत. यावर त्यांनी शिक्का मारला आहे.

प्रा० पां० ना० कुलकर्णी ('सेना म्हणे'- प्रस्तावना) आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, "सेनाजी मला शंभर टक्के मराठी वाटतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई यांच्या विषयीचा त्यांचा जिव्हाळा उसना वाटत नाही. प्रत्यक्ष दर्शनाचा स्मरणोत्तर ओलावाही येथे जाणवत राहतो. या भावंडांच्या समाधि- स्थानाशी त्यांच्या भावना खोलवर गुंतल्या आहेत. शिवावतार निवृत्तीनाथांना ते वारंवार आणि निरंतर नमस्कार करतात."

सेनाजी जसे महाराष्ट्रीय संत असावेत असे मत व्यक्त करणाऱ्या सोबत ते महाराष्ट्राबाहेरील होते, या संदर्भात अनेकांनी पुराव्यांसह मते व्यक्त केली आहेत.

डॉ० शं० गो० तुळपुळे यांनी संपादन केलेल्या 'मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड : पहिला मध्ये ते म्हणतात, "एक गोष्ट स्पष्ट आहे की, संत सेना हा न्हावी जातीचा असून तो जबलपूर जवळील बांदूगड येथील राजाच्या पदरी होता. त्याची मातृभाषा हिंदी होती, त्याचे नाव 'सेना' असून त्याचे अनुयायी उत्तरेकडे आढळतात."

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-12.06.2025-गुरुवार.
===========================================