पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले, अवचित तुला मला भिजवले.

Started by Atul Kaviraje, June 29, 2025, 02:48:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

       पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले, अवचित तुला मला भिजवले.
      ===================================================

वाहत होत्या आता सूर्यधारा,
पाहता पाहता कोसळल्या पर्जन्यधारा.
असाच असतो का पाऊस?
फजिती पाहतो वर्षवून गारा.

तू आणि मी छतावर,
उन्हधारा घेत होतो अंगावर.
अचानक आले आभाळ भरुनी,
बरसल्या धारा अगणित वर्षावानी.

पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले,
अवचित तुला मला भिजवले.
त्यानिमित्ताने का होईना प्रिये,
तुला मला जवळ आणले.

धुंद पावसात मी भिजत,
तुला हळूच जवळ ओढले.
आणि कितीतरी वेळ छतावर,
दोन जीवांचे मीलन झाले.

निघून गेला बराच काळ,
निघून चालली अशीच वेळ.
पाऊस थांबण्याचे नाव घेईना,
छतावरून तुझी-माझी सुटका होईना.

पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले,
अवचित तुला मला भिजवले.
तुला मला जवळ आणित,
हृदयी प्रेमाचे बीज रुजवले.

ढगांनी जणू दडवलं सूर्याला,
थोपवून धरलं सहस्त्र किरणाला.
झाकोळून गेले पुरेपूर आभाळ,
ढग बरसवताहेत मोत्यांची सहस्रमाळ.

हतबल मी, निराश तू,
आज सूर्यदर्शन होणे नाही.
तसेच बसून राहिलो छतावर,
पाऊस आमची गंमत पाही.

पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले,
अवचित तुला मला भिजवले.
मनाला घालीत मोडता दोघांनी,
ओंजळीत अमृताचे तुषार भरले.

पावसासमोर महान सूर्यही हतबल,
तेथे तुझी-माझी काय बिशाद.
संगीतIत बुडून गेलो पावसाच्या,
ऐकुनी तृप्त सप्तस्वर नाद.

आवडू लागला दोघांनाही पाऊस,
त्याचे पडणे, त्याचे भिजवणे.
लळा लावीत आम्हा दोघांना,
छतावर त्याचे मनसोक्त बागडणे.

पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले,
अवचित तुला मला भिजवले.
आपले प्रेम प्रगाढ करीत,
थोडे अधिकच जवळ आणले.

कितीतरी वेळ आम्ही दोघे,
गुंफित होतो पावसाचे धागे.
पुन्हा एकदा सडा शिंपडीत,
पावसाने केले आम्हा जागे.

आम्हाला गरज नव्हती शब्दांची,
रिमझिम ऐकू येतेय पावसाची.
मंत्रमुग्ध करित दोघांना पाऊस,
बरसात करित होता आनंदाची.

पावसाने आपल्याला पुरेपूर अडकवले,
अवचित तुला मला भिजवले.
मनात घर करतो पाऊस,
मनापासून आवडतो मला पाऊस.

--अतुल परब
--दिनांक-29.06.2025-रविवार.
===========================================