अण्णागिरी करणार्‍या सगळ्यांना सलाम..

Started by Gaurav Patil, August 29, 2011, 07:16:11 PM

Previous topic - Next topic

Gaurav Patil

अण्णागिरी करणार्‍या सगळ्यांना सलाम..
--अतुल कुलकर्णी (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून)

सलाम.. सलाम.. सलाम..
अण्णांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय घेणार्‍यांना सलाम..
त्यांना तुरुंगातून बाहेर काढून रामलीला मैदानावर नेणार्‍या,
सत्ताधार्‍यांपासून तमाम पोलिसांना सलाम..
त्यांच्या मागे फिरणार्‍या, चोवीस तास अण्णामय झालेल्या
तमाम माध्यमांना सलाम..
पायाच्या नखापासून, डोक्याच्या केसापर्यंत,
अण्णांना भ्रष्टाचारी म्हणणार्‍या,
आणि नंतर अण्णागिरीने चकित झालेल्या,
मनीष तिवारींना सलाम..
कपिल सिब्बल, पी. चिदंमबरम यांच्या 'दूरदृष्टी'ला सलाम,
सलमान खुर्शिद, प्रणवदांच्या मुत्सद्देगिरीला सलाम..
अचानक आलेल्या मेधा पाटकरांनाही सलाम..
'आज खूषखबर मिलेगी' असं भविष्य सांगणार्‍या
भय्यूमहाराजांना आणि त्यांच्या अनुयायांनाही सलाम..
रामलीला मैदानावरची गर्दी कमी होऊ लागलीय..
असं वाटून 'बुढ्ढे को बाहर लाव' असा आदेश सोडणार्‍या
टीम अण्णालाही मनापासून सलाम..
सलाम.. सलाम.. सलाम..
अण्णा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है..
असं म्हणत अण्णांना उपाशी ठेवणार्‍यांना सलाम..
रोज नवा ड्रेस घालून येणार्‍या किरण बेदींना सलाम..
कायद्याची भरमसाठ माहिती असणार्‍या
अरविंद केजरीवाल यांनाही सलाम..
उपाशी अण्णांच्या समोर रामलीला मैदानावर
अण्णा का ढाबा उघडणार्‍यांना सलाम..
७४ वर्षे वयाच्या उपाशी म्हातार्‍या माणसासमोर,
जेवणार्‍या लोकांना, मान्यवरांनाही सलाम..
संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा,
शनिवारी अधिवेशन चालविणार्‍या सगळ्यांना सलाम..
अण्णांच्याच मार्गाने चालण्याचा प्रण करणार्‍या पण,
७४ वर्षीय म्हातार्‍या माणसाच्या उपोषणाचे रहस्य काय
असे विचारणार्‍या लालूजींनाही सलाम..
आठ दहा मुलं असणार्‍यांना ब्रम्हचर्यांचं महत्व काय
असं लालूंना ठणकावणार्‍या अण्णांना सलाम..
सलाम.. सलाम.. सलाम..
बेभान झालेल्या गर्दीला सलाम..
गर्दीला बेभान करणार्‍यांनाही सलाम..
हाती तिरंगा घेऊन फिरणार्‍या हातांना सलाम..
त्याच हाताने नंतर ऑफिसात पैसे खाणार्‍यांनाही सलाम..
बाहेर सानेगुरुजी आणि आत 'नाणे'गुरुजींवर
र्शध्दा ठेवून काम करणार्‍या हजारोंनाही सलाम..
वंदेमातरम् गीत अण्णांना सर्मपित करणार्‍या
गानकोकिळा लता मंगेशकरांनाही सलाम..
अण्णांची तुलना गांधीजी, नेल्सन मंडेलांशी करणार्‍या
ओम पुरींना देखील मनापासून सलाम..
जगाची चिंता करणार्‍या, आंदोलनाला आतून विरोध,
बाहेर पाठिंबा देणार्‍या, कम्युनिस्टांनाही लाल सलाम..
'तत्वत: मान्यता' म्हणजे जणू कायदाच झाल्याचा
माहौल तयार करणार्‍या मुत्सद्दी सत्ताधार्‍यांना सलाम..
त्यातून दिवाळी साजरी करणार्‍यांनाही सलाम..
सलाम.. सलाम.. सलाम..
या सगळ्या आंदोलनाला इव्हेंट म्हटलं तर
माझं डोकं फोडतील..
समूहाला विस्मृतीचा शाप असतो,
यावर राजकारण्यांचा विश्‍वास असतो,
म्हणूनच अशा आंदोलनाचं फलित नसतं..
असं म्हणालो तर मला रस्त्यावर मारतील..
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर मी अण्णावादी,
नाही दिला तर मी भ्रष्टाचारी.. असं म्हणालो तर
हेच लोक फार शहाणा झालास का म्हणतील..
म्हणूनच दोस्तहो,
अण्णांच्या आंदोलनाला दुसरी क्रांती म्हणतो..
मीडियाने पेटवलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो..
मात्र, अहिंसावादी आंदोलनं विसरलेल्या देशाला..
कोणत्याच गोष्टीवर पेटून न उठणार्‍यांना..
खडबडून जागं केल्याबद्दल, एक सलाम अण्णांना मनापासून करतो..
सलाम.. सलाम.. सलाम..

-अतुल कुलकर्णी
अधून मधून

केदार मेहेंदळे