दिवाळी पहाट: काल आणि आज

Started by designer_sheetal, October 21, 2011, 12:56:25 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

http://designersheetal.blogspot.com

हल्लीच वाचनात एक कविता आली "आता दिवाळी पहाट पूर्वी सारखी रंगत नाही". खरच दिवाळी पहाट आता पूर्वी सारखी रंगत नाही. कितीही ओढून ताणून तो माहोल क्रिएट करायचा प्रयत्न केला तरी ती मजा आता नाही.... तसं बघायला गेलं तर पूर्वी पेक्षा झगमगाटाची, साज-सजावटीची साधनं जरी वाढली असली तरी त्या साधेपणामध्ये जी पारंपारिकता ठासून भरली होती ती आता नाही.

पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिलं कोण उठणार यावरून आम्हा लहान मुलांमध्ये स्पर्धा लागलेली असायची. जो पहिला उठणार तो दुसऱ्याच्या दारात फटाक्याची माळ लावणार. पहाट उगवायची ती आमच्या दारात लावलेल्या फटाक्यांच्या आवाजानेच. बाहेर मिट्ट काळोख असायचा पण अक्खी गल्ली कंदिलाच्या प्रकाशात न्हाहून निघालेली असायची. दिवाळीची खरी मजा असायची ती सकाळी सकळी नवीन कपडे घालण्यात. तेव्हा फक्त वाढदिवस, दिवाळी, गणपतीलाच कपड्यांची खरेदी केली जायची. आता दर वीकेंडला Shopping केली जाते, कपड्यांची गरज असली नसली तरी.

आता दिवाळी म्हणजे एक event असतो. ज्यात फक्त presentation महत्वाच असतं, खरी दिवाळी तर त्यातून कधीच हद्दपार झालेली असते. आता दिवाळी म्हणजे महागडे कपडे, विकतचा low-cal फराळ, घराचा makeover, e -ग्रीटींग्स, कर्णकर्कश आवाजाचे फटाके आणि प्रदूषण. पूर्वी घरोघरी टेलिफोनसुद्धा क्वचितच असायचे त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटींग्स हा एकमेव पर्याय असायचा. मग आठवडा भर आधी आईच्या शिव्या खावून ग्रीटींग्स पोस्ट केली जायची. पूर्वी लोकं एकमेकांना भेटल्यावर Happy Diwali विश केल्याचं माझ्या पाहण्यात नाही त्या ऐवजी लोकं फराळासाठी घरी येण्याचं अगत्याच आमंत्रण द्यायची.

घरच्या बायका जेव्हा फराळ करण्यात गुंतलेल्या असायच्या तेव्हा घरचे पुरुष कंदील बनवायच्या कामात मग्न असायचे. विकतचे कंदील आणणारी माणसं तेव्हा खूप कमी होती. घरचे तर घरचे प्रत्तेक गल्लीचा तेव्हा एक वेगळा मोठा कंदील असायचा. पूर्वी फराळ करणं हा एक सार्वजनिक event असायचा. चकलीचा साचा ते शंकरपाळीच चिरणं यांना तर ड्यूट्या लागलेल्या असायच्या. २/४ जणांचे पोळपाट लाटणं, साचे एकत्र करून शेजारच्या काक्या, माम्यांना मदतीला बोलावून प्रत्येकाचा फराळ तयार व्हायचा. कोणाचा फराळ किती चांगला झालाय कि किती बिघडलाय हे दिवाळीच्या आधीच सगळ्यांना माहित असायचं.

आता, दिवाळीच्या पहाटे ५ वाजता mobile वर अलार्म वाजतो. मी ताडकन उठून बसते. बाबा ओरडतात शीतल ती कटकट बंद कर येवढ्या लवकर उठून काय करणार आहेस? माझ्यात दिवाळी संचारलेली असते. मी पटकन उठून बाहेरचा कंदील आणि तोरणं ON करते. बाहेर बर्यापैकी उजेड पडलेला असतो. १-२ जणांचेच कंदील बाहेर मिणमिणत असतात. कपाटात ठेवलेलं उटन बाहेर काढते (आजकाल ते आणायला लागत नाही १२ महिने ते कपाटात पडलेलं असतं. natural scrubber आहे ते याचा हल्लीच साक्षात्कार झालाय त्यामुळे ते वरचेवर वापरलं जातं). घर स्वच्छ आवरून मी खिडक्यांवर व घरात tea lights लावते (मेणाचे दिवे हो तेलाचे कुठे वापरतात आता). पहाटेच्या काळोखात घरभर लुकलुकणारे दिवे, खिडकीतला कंदील आणि तोरणांची रोषणाई, उदबत्त्यांचा सुवास आणि सनईचे मंद सूर वातावरणात इतकी प्रसन्नता आणतात कि ज्या दिवाळी पहाटसाठी १५ दिवस मेहेनत घेतलेली असते त्याचं चीज झालेलं असतं.

आजची दिवाळी कितीही हाय-टेक असली तरी त्याला जुन्या मातीच्या पणत्यांची, गेरू ने सारवलेल्या जमिनीची आणि टिपक्यांच्या रांगोळीची सर नाही...

शीतल
http://designersheetal.blogspot.com