विसावा

Started by shardul, November 27, 2011, 10:17:03 PM

Previous topic - Next topic

shardul


मी शंखशिंपले रे, वाळूत वेचणारा
मोती तळी टपोरे, मज देईना किनारा

गाता न ये सुरेल, घालीन गोड शीळ
ठेका समेवरील ,चुकुनी न गाठणारा

रचिले न प्रेमगीत, केली उदंड प्रीत
हृदयातले गुपीत, हृदयात ठेवणारा

गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी
घेऊन एकतारी, वारीत नाचणारा

येऊन पंढरीत, जाता न मंदिरात
कळसास फक्त हात, जोडून परतणारा

हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे
परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा

जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता
येऊन शरण संता, चरणी विसावणारा


Kavi : अशोक गोडबोले, पनवेल.

केदार मेहेंदळे