झुळूक

Started by shindemithil, December 07, 2011, 12:44:56 PM

Previous topic - Next topic

shindemithil

तुझ्या नसण्यातही असण्याचा भास... हे काही नवीन नाही... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत तुला पाहणे अजूनही संपले नाही...

गार वाऱ्याची झुळूक आली
अंग अंग शहारून गेली
जाणवली त्यातही ओळखीची उब
ओळखीचा तो अलवार स्पर्श
माजले विचारांचे काहूर मनी
तुला भेटून तर नसेल ना आला हा वारा
फुंकर घालून हळूच
उडवले असतील तुझे केस
अन मग गालांसोबत
मस्ती करणाऱ्या त्यांना
दटावून बोटांनी दोन
सरकवले असेल कानामागे
पण तेही कुठे ऐकणारेत
एखादी बट येईलच पुन्हा गालावर
पाहून हे सारे
स्वतःशीच हसशील गालात
मग हा सारा खेळ मांडणारा वारा
पिसा होऊन भटकेल आपला रस्ता...
पुन्हा तशीच झुळूक आली
पण या वेळी मात्र
देहाबरोबर मनाही शहारून गेली

केदार मेहेंदळे