देवा पांडुरंगा

Started by स्वप्नील वायचळ, January 16, 2012, 06:05:44 AM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

देवा पांडुरंगा कुठे आहेस रे बाबा |

हि काळी माती माझी माय
त्या सावकाराकडे गहाण हाय
अव्वाच्या सव्वा त्याचं व्याज
लेकरांच्या शर्टाला नाही काज
पाऊस नाही तर उपासमार
नाहीतर पिकाचा भावच गार
आमचा गाऱ्हाणं कोण ऐकणार
कि असेच आम्ही हकनाक मरणार?

देवा पांडुरंगा कुठे झोपला रे बाबा |

मी तर अजून हे जग पाहिलंच नाही
आईच्या पोटातच पाहते स्वप्ने काही
मलापण माझं बालपण जगायचय
आई बाबांसोबत खूप खेळायचय
पण हे सगळं शक्य आहे मी या जगात आले तर ना
स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार, जन्म झाला तर ना !

देवा पांडुरंगा कुठे आहेस रे बाबा |

राजकारण्याच वचन म्हणजे अजगराच पचन
सामान्य माणूस त्यात नेहेमीच गुरफटन
राजकारण म्हणजे स्वतःचा विकास
देशाला देशोधडी लावण्याचा प्रयास
राजाने कधी प्रजेला चोरले होते का
कुंपणाने कधी शेत खाल्ले होते का
देवाच्या दिव्याखाली किती मोठा अंधार
लांडग्यांच्या राज्यात बसतो सज्जनाला मार !

देवा पांडुरंगा उठ रे बाबा |

भूकंप सुनामी कमी झाले म्हणून आता बॉम्बस्फोट होतात
बाहेर गेलेला माणूस घरी येईल का म्हणून घरचे ग्रस्त होतात
देशाचे संरक्षक दारूगोळ्यामध्येदेखील पैसे खातात
सामान्य लोक हातावर हात धरून मरत राहतात
अरे त्या शिवाजीने सामान्य जनतेला दिले छत्र
अन आजचे शासक घेतात नुसते हिवाळी सत्रं !

देवा पांडुरंगा आता तरी जाग रे बाबा
गरीब जनतेचा  कनवाळू एक दुसरा शिवाजी दे रे बाबा |

                                       -स्वप्नील वायचळ