खरंच अंधार तुला खातो का?

Started by dinesh.belsare, January 06, 2026, 12:08:11 PM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

अंधार जेव्हा तुला गिळतो,
तू स्वतःलाच स्वतः हरवतोस.
सांग भास्करा, तेव्हा तू कोण असतोस?

जगाला वाटतं—तू संपलास,
काळोखाच्या विळख्यात पूर्ण हरवलास.
खरंच अंधार तुला खातो का?
सांग दिनकरा, तू तेव्हा कुठे असतोस?

रात्र संपते, आणि तुला 'स्व'चं भान होतं,
भ्रम नुरसतो,
लाल-तांबड्या प्रभेत तू प्रचितीला येतोस.
सांग दिनेशा, तेव्हा तू काय असतोस?

भासतोस आम्हाला असा,
जणू तूच जग झाला आहेस.
प्रकृतीला ऊर्जा देण्यासाठी तू पुन्हा परत येतोस.
सांग तेजसा,
तू खरंच जाऊन पुन्हा येतोस का?

जसं जसं भान येतं,
तसं तसं भ्रम लयाला जातो...
लाखो-लाख किरणांचा उदय होतो.
हाच खरा तू असावा—
कधीही न जाणारा,
कधीही न विझणारा,
प्रकाशस्वरूप.
होय सूर्य,
खरंच तूच सदैव
सत्–चित्–आनंद असतोस...

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९