निवडणूक रणधुमाळी...

Started by अविनाश सु.शेगोकार, February 16, 2012, 05:33:21 PM

Previous topic - Next topic
प्रति माननीय,
नगरसेवक साहेब
अबक वार्ड,
अबक शहर-१२३४५६.

विषय : नुकत्याच होऊ घातलेल्या निवडणुकांबद्दल माझे मत.

महोदय,
      मी आपल्या वार्डात राहणारा एक सामान्य माणूस आहे. अनेक वर्षापासून आपण लोकांसाठी किती झटता हे सर्व लोकांना ठाऊकच आहे. निवडणुकीत आपणाला डुक्कर हे चिन्ह मिळाल तरीपण आपण पूर्ण निष्ठेने आणि मनापासून डुकराच नांव सार्थक केल. खर तर मला प्रश्न पडला होता की आपल्याला मिळालेल चिन्हाचा प्रचार आपण कोणत्या मार्गाने कराल पण आपण खरच उत्तम कार्य केल.
                                 सांगायचा मुळ मुद्दा असा की आपण मागच्या निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे बरीच कामे पूर्ण झालीत. जसे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तर आपण आवर्जून लक्ष घातल्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी बोरिंग झाली. खेळाच्या मैदानाचा विकास तर एवढा झाला की आता मैदानात खेळाबरोबर गुरा-ढोरांच्या चाऱ्याची पण समस्या सुटली. कचरा गोळा करणाऱ्या गाड्यामुळे तर चक्क लोक्कानी घराच्या अंगणातच सेंद्रीय खत तयार करण्यास सुरुवात केली. आणि राहिला प्रश्न गटारांचा तर आपल्या विकासकामामुळे लोकांनी आता शेजारच्या तलावाच्या काठावर कपडे व आंघोळी करण्यास सुरुवात केली. आपण दिलेला एकोप्याचा संदेश लोकांनी एवढ मनाला लावून घेतला की आता पडसाला बाहेर जाणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली.
                                यंदा आपण नक्कीच निवडून याल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आपण दिलेली वचणे जसे आपल्या वार्डात २४ तास पाणी, भूमिगत गटार, कॉन्क्रीटचे रस्ते, सार्वजनिक बाग इत्यादी. कामे यावेळी तरी नक्कीच पूर्ण होणार. हा प्रश्न वेगळा आहे की मागच्या वेळी आणि त्याच्या मागच्यावेळीपण आपण हेच म्हणाला होतात. पण तरीही आम्हाला विश्वास आहे की यावेळी ही कामे नक्कीच पूर्ण होणार. वार्डाच्या विकासाबरोबर आपण आपल्या घराचा जो विकास केला तो अतुलनीय आहे. मला चांगल्या प्रकारे आठवते की १० वर्षाआधी दोन १० बाय १० खोल्यांच रुपांतर आपण दुमजली इमारतीमध्ये केल. नाही म्हणजे बरोबर आहे ते कारण विकासाच्या गंगेचा उगम हा आपल्या घरापासूनच व्हायला पाहिजे. एकेकाळी सायकलवर फिरणारे नगरसेवक साहेब आता टोयोटा मध्ये फिरतांना बघितल्यावर आम्हाला खरच खूप आनंद होतो.
                                वापरण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांचा हे प्रश्न तुम्ही एकाचवेळी सोडवून एका दगडात दोन पक्षी मारलेत. कसे तर ते असे आपण बांधलेला रस्ता हा पहिल्या पावसातच वाहून गेला. त्यामुळे त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत त्यांना खड्डे म्हणणे योग्य वाटत नाही कारण मागच्या वेळी त्यामध्ये अर्धी जीप अडकली होती. तर मुद्दा असा की त्या खड्यांमुळे आम्हाला पावसाळ्यात तर सोडाच पण उन्हाळ्यातसुद्धा पाणी मिळते. मुख्यमंत्री निधीतून आपल्या वार्डात वाचनालय बांधले असे मी आपल्या पत्रकात वाचले होते पण वार्डात मला असे वाचनालय मागील १० वर्षात आढळून आले नाही बहुधा लिहितांना पत्रकामध्ये चूक झाली असेल. निवडणुकीच्या वेळी मत मागतांना आपण एवढी जीव ओतून कामगिरी केली की भिकाऱ्यालासुद्धा लाज वाटावी. हे तर लोकांच म्हणन झाल हो ! त्यांना काही काम-धंदे नाहीत म्हणून ते आपल्याबद्दल असे बोलत असतात. असो त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
                        मागच्यावेळी म्हणे आपण निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे वाटले होते. नाही चुकीच काय त्यात जोपर्यंत मतदाराची आर्थिक भरभराट होणार नाही तोपर्यंत सार्वजनिक विकास होणार तरी कसा ! माझ्या तर असापण ऐकण्यात आल होत की प्रचारसभा झाल्यावर रात्रीच्यावेळी बारमध्ये "सोमरस" ची सभा पण आयोजित केली होती आणि त्यास भरभरून प्रतिसाद लाभला होता. ते पण बर आहे दिवसभर गल्लीत ही मुल टवाळकी करीत असतात त्यापेक्षा पिऊन कुठेतरी शांत पडलेली बरं ! तसेच एका गोष्टीबद्दल मी आपल नक्कीच कौतुक करणार आहे. आपण प्रचारात जी नवनवीन गाणी वापरता ना, त्यामुळे घरी असतांना सुद्धा कंटाळा वाटत नाही. आणि आपल्या उदार मतामुळे नवोदित कवी, गायक आणि संगीतकारांना संधी मिळते.
                       असो यावेळीपण आम्ही मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करू जेणेकरून आपल्या सारखा कर्मयोगी पुरुष परत निवडून येईल. आणि आपल्या वार्डाचा जो विकास आपण मागील १० वर्षापासून करीत आले आहात तो पुढेपण अशाच रीतीने करणार.
                                                                                                                                                                           आपलाच विश्वासू,
                                                                                                                                                                         एक सामान्य माणूस                                                                                                                                                                                           १३-०२-२०१२
: अविनाश सु.शेगोकार