अर्थ तू होशील का?

Started by Shantanu Deshpande, February 12, 2026, 12:22:17 PM

Previous topic - Next topic

Shantanu Deshpande

झालो मी शब्द कधी तर अर्थ तू होशील का?

मांडितो कुंचला कागदी नुसतीच बाराखडी ही,
रेषाच नुसत्या उभ्या-आडव्या, कधी वेलांटी उकारही,
व्हाया बोध त्यातून काही मालिका होशील का?
झालो मी शब्द कधी तर अर्थ तू होशील का?

मनी येती विचार सारे हवेत विस्कटलेले,
जसे सागरकिनारी पसरले शंख-शिंपले,
बांधुनी एकत्र सगळे माळ तू होशील का?
झालो मी शब्द कधी तर अर्थ तू होशील का?

लिहितो कवी ओळी आकस्मिक स्फुरलेल्या,
कधी द्वंद्व मनीचे, कधी आठवणी विरलेल्या,
उमटाया काव्य तयातून रचना होशील का?
झालो मी शब्द कधी तर अर्थ तू होशील का?

— शंतनु देशपांडे
-8793732117