शब्दांची भेट!!

Started by Shantanu Deshpande, February 17, 2026, 12:07:10 PM

Previous topic - Next topic

Shantanu Deshpande

संध्याकाळी कालच्या मी, खोलीत माझ्या रेंगाळत होतो,
काय चाललंय आत माझ्या, डोकावून जरा पाहत होतो.

तासन्‌तास गेले तरी, उत्तर काही सापडेना,
मनातल्या गदारोळाचं, कारण काही भेटेना.

म्हणून निघालो बाहेर, म्हटलं जरा फिरून यावं,
मनाचं हे रोजचंच आहे, त्यात काय नवं?

पाऊल पडताच उंबरठ्यात, उभे शब्द दत्त बनून,
म्हणाले — "थांब जरा, थोडं घेऊ महत्वाचं बोलून.

परवा म्हणे तू शंख आमच्या नावाने करीत होतास,
'संपलं नातं आपलं' असं, भिंतीवर लिहित होतास.

आठव ती भेट पहिली, जेव्हा कविता तू केलीस,
आम्हीच होतो, जेव्हा निबंध तू लिहिलीस.

घर सोडताना भावना, तू आमच्या मदतीने मांडल्या,
तुझे लेख, तुझ्या कविता — आम्हीच की रे सजवल्या.

टाळ्या, स्तुती, समाजमाध्यमांवर
आमच्या मुळेच मिळाली.
कधी थाप कौतुकाची पाठीवर
आमच्या मुळेच तर पडली.

तुला आता काही स्फुरत नाही, यात आमचा काय दोष?
कारण शोध याचा, उगा आमच्यावर का रोष?

मात्रा, चाल, लयीचा फुकट तुला ध्यास,
मग शब्द वेचावे लागतात — येत नाहीत वीणा सायास.

वही-पेन हाती घेऊन, फक्त उमटू दे भावना,
कसे बहरतात शब्द बघ, त्याच तेजाने पुन्हा.

कर सुरुवात नव्याने, आपली साथ सुटणार नाही,
घट्ट नातं आहे आपलं — मृत्युपर्यंत तुटणार नाही.

नमस्कार मी करता झालो, आता पूर्णतेचा अट्टाहास नको,
मी असेच लिहित राहावे, त्यास उसनवारीची खेप नको.

जे रचावे वेडेवाकडे, ते फक्त माझं असावं,
हे शब्दांनो, मनात माझ्या — अनंत रूपी तुम्ही वसावं.**

— शंतनु देशपांडे,
8793732117
— शंतनु देशपांडे
-8793732117