कविता विरून गेली!!

Started by Shantanu Deshpande, February 18, 2026, 11:51:38 AM

Previous topic - Next topic

Shantanu Deshpande

शब्दफुलांनी अन् रंगांनी जी होती सजलेली,
ती मनाच्या फलकावरची कविता विरून गेली.

वळून बघता मागे दिसती किताण रंगवलेले,
प्रेम, स्पृहा अन् भावनांचे सोबतीस कुंचले.
कुंचल्यांच्या टाके मधली ओल सरून गेली
ती मनाच्या फलकावरची कविता विरून गेली.

ओळी स्फुरल्या निघून गेल्या न येता कागदावरती,
मनी कवडसे आठवणींचे अन् विचारांची भरती,
त्या भरतीची लाटही मग उमाळ्यात जिरून गेली.
ती मनाच्या फलकावरची कविता विरून गेली.

मी धावतो मागे मागे शब्द पुढेच जाती,
जणू असती औपचारिक बोलघेवडी नाती,
त्या शब्दाच्या नात्यांमधली वीण उसवून गेली.
ती मनाच्या फलकावरची कविता विरून गेली.

-शंतनु देशपांडे
— शंतनु देशपांडे
-8793732117