व्हॅलेंटाईन डे!

Started by umesh kothikar, February 27, 2012, 01:28:10 AM

Previous topic - Next topic

umesh kothikar

तीन दिवसांपासून बायको, लेकरं
उपाशी, भुकेजली
अन काम पण नव्हतं भेटलं त्याला
हिंडून हिंडून
आज सकाळीच पुन्हा रस्ता झालेल्या आयुष्याला ओढत
काम शोधत आला तो
रस्त्यावर, तर सगळीकडे
गुलाबच गुलाब....सगळेच गुलाबी
थबकला एका दुकानाशी....'शेठ, काय बी काम आसन तं.....'
'इकतोस का फ़ुलं?' 'रस्यावर नेउन?'
लेकरांची भूक फुलांत बघत
तो ओरडू लागला, 'गुलाब, गुलाब, ताजे गुलाब'
दिवस सरला;
दिवसभर गुलाब विकून काटे झालेल्या
त्याच्या मुठीमधे
पोटापुरते पैसे आले
त्या रात्री,
उपाशी गुलाबाला, दव मिळावे
तसे लेकरं, बायको पोटभर जेवले
पिल्लं, रात्र कुशीत घेउन झोपल्यावर
त्याने, हळुच
लपवून आणलेला एक गुलाब
तिला दिला
ती हसली, लाजत; काहीच न कळून
त्याच्यात मिसळून जात,
मिटून; स्वतःच गुलाब होऊन
तिच्या तृप्त झालेल्या; येणार्‍या जीवाने टपोरल्या
सुकुमार पोटावरून हात फिरवत
त्याला वाटलं
खरंच,
'भरल्या पोटी.. प्रेम किती सुंदर असतं ना!'


केदार मेहेंदळे