विस्मयमय सृष्टी|||

Started by dinesh.belsare, March 15, 2026, 10:44:20 AM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

आश्चर्यच आश्चर्य
सृष्टीच्या प्रत्येक कणातील विस्मय 🌿

नदीचे समुद्राकडे सतत वाहणे,
पक्ष्यांचे सुस्वर, शांत गाणे।
नभाचे झिमझिम चांदणे,
नक्षत्रांचे अगणित, अनंत लेणे—
आश्चर्यच आश्चर्य।

गायीचे पिलासाठी हंबरडणे,
बियातून वृक्षाचे येणे।
फुलातून सुगंध दरवळणे,
नभातून अमृतधारा बरसणे—
आश्चर्यच आश्चर्य।

समुद्राचे अथांग होणे,
पर्वतांचे अचाट उभे राहणे।
भूमीचे अन्नदानाचे यज्ञ होणे,
आणि जीवांना शेवटी सामावून घेणे—
आश्चर्यच आश्चर्य।

श्वासाचे येणे, श्वासाचे जाणे,
ज्ञानेंद्रियांनी अस्तित्व अनुभवणे।
कर्मेंद्रियांनी प्रतिसाद देणे,
परगृही असूनही मालकत्व घेणे—
आश्चर्यच आश्चर्य।

माझे सुख-दुःख भोगणे,
'कर्ता' म्हणुनी कर्तव्यनिष्ठ होणे।
त्याचे निशब्द, निवांत, अव्यक्त असणे,
व्यक्त होऊन अनुभवास येणे—
आश्चर्यच आश्चर्य।

ह्या सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले—
त्याचेच अद्भुत, अनंत आश्चर्य। ✨