वैशाख वणवा ("निसर्गकविता")

Started by shashaank, April 12, 2012, 10:19:14 AM

Previous topic - Next topic

shashaank


वैशाख वणवा
पेटला नभात
रानात, भुईत
काहिली अंगात

कोरड्या रानात
कोळपली पात
जाळतो भास्कर
फुफाटे धुळीत

चैत्राची पालवी
डोलते भरात
पळस पांगारा
फुलतो रानात

येतसे भरात
वैशाख मिरास
कोवळ्या पानांची
नाजुक आरास

जागोजाग तुरे
फुलती रुखात
रंगीन वैशाख
खुलतो तोर्‍यात

मधुर गंधाचा
मोगरा भरात
रातीची नक्षत्रं
फुलती वेलीत

ओलावा मातीचा
हिरावून नेत
जागोजाग भेगा
भुईच्या उरात

दिवसा जाळोनी
थकतो वैशाख
घेऊन निद्रिस्त
गारवा कुशीत

दूर त्या रानात
आभाळा बघत
आशा पावसाच्या
कोरड्या डोळ्यात .......


-shashaank purandare.

prasad26

खूप सुंदर .
वैशाखाचे चित्र डोळ्यासमोर छान उभे राहते.
मी २-३ वेळा वाचली . शब्दांची रचना , छंद इतका सुंदर कि वाचताना आपोआप एक लय धरली जाते.
फक्त खालील शब्दाचा अर्थ कळला नाही
फुलती रुखात
रुखात म्हणजे ?

shashaank

धन्यवाद मित्रा - रुखात - वृक्षात - बोलीभाषेत वृक्षाला रुख म्हणतात.
सर्वसाधारणपणे - गेयता, लय असेल तरच कवितेची एक आगळीच मजा असते - आपण सगळ्यांनी आपल्या लहानपणी
ऐकलेलं -

इथे इथे बैस बैस मोरा
बाळ देतं चारा


किंवा

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
- कशामुळे छान वाटतात, तर त्या गमतीशीर लयीमुळे.......