तांदूळ निवडतांना-----

Started by Girish Deshmukh, April 20, 2012, 05:30:46 PM

Previous topic - Next topic

Girish Deshmukh

तांदूळ निवडतांना-
------------------
तांदूळ निवडतांना,
तू तंद्रीतच असतेस, आपल्याच,
नजर लागलेली कुठे शून्यात...
'ह्यां'च्या काहीतरी उगीचच विचारण्याने
तू भानावर येतेस
आणि खजील होउन
खालचा ओठ दाताने घट्ट दाबुन धरत
गडबडीने निवडलेलेच तांदूळ
पून्हा निवडू लागतेस,
तेव्हा...................

किंवा,
रस्त्यातून जाताना,
तुझं लक्षच नसतं
भोवतीच्या रहदारीकडे...
कुणा उनाड पोराच्या धक्क्यानं
हातातलं सामान रस्तावर पसरतं,
सार्‍या नजरा चुकवत खालमानेनं
दोन्ही खांद्यांवरुन पदर ओढून घेत
रस्तावर पसरलेलं सामान
तू गोळा करू लागतेस
तेव्हा....................

किंवा,
तू घरात एकटी
बाहेर पाउस धूवांधार
लटक्या चाहूलीनं
तू दार उघडून बघू लागतेस
आळीच्या सीमेपर्यंत तूझी नजर
फिरुन परत येते, पण
दिसत नाही कुणीच !
चेहर्‍यावरच्या न उडालेल्या
तुषारांच्या निमित्त्याने
तू पदरानं डोळे टिपू लागतेस
तेव्हा.................

तेव्हा,
खरं सांग,
तुला तेच आठवत असतं ना,
तेच सगळं, पूर्वीचं,
माझ्या संदर्भातलं ?

------------------------
गिरीश देशमुख

केदार मेहेंदळे

aprtim kavita.... asa shevat far thodya vela jamto... khup chan