गारुड

Started by शिवाजी सांगळे, June 22, 2026, 05:53:55 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गारुड

भरून येता नभी एखाद मेघ सावळा
घेतात हेरून आठवणींना कातरवेळा

झुरते सृष्टी न् कष्टी होते मावळतीला
घेत मनी हुरहूर, अवघा झुले हिंदोळा

अस्ताचली दिवाकर जातांना तांबुस
भास असा जळात बागडती ज्वाळा

विखरून रक्तिमा क्षितिजावर हलका
अलगद घुमतो वाऱ्याचा सूर आगळा

नभी तुटक परतीची, ती खग रांगोळी
दूर किणकिणती गुरांच्या घुंगुर माळा

मनमोहक जरी करी अंतर्मुख सकलां
गारुड मनावर का घालती कातरवेळा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९