(must read)मी आणि हृदयचोर

Started by प्रशांत नागरगोजे, May 06, 2012, 10:32:00 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुपारची वेळ होती. मी शाळेतून घरी चाललो होतो. भर उन्हात पाऊलवाटाने मी एकटाच चाललो होतो. जाता जाता एके ठिकाणी मला पोपटाचा रडका आवाज ऐकू आला. मी नजर वळवून पाहिलं तर रस्त्याच्या बाजूला एका लिंबाच्या झाडाखाली एक पोपटाचे पिल्लू रडत होते.   मी जवळ जाऊन पाहू लागलो. ते छोटसं पिल्लू व्याकुळतेने ओरडत होत. त्याचे डोळे कोणाला तरी शोधत होते. भर उन्हात तो लहानसा जीव कोणालातरी हाक देत होता. पण त्याची हाक ऐकायला तिथे कोणीच नव्हते. ते ओरडत  होते ओरडत होते.


मला वाटलं ते बिचार घरट्यातून खाली पडलं असावं, म्हणून मी आसपासच्या झाडांवर घरट्याचा शोध घेऊ लागलो पण नजरेला काही एक सापडलं नाही. मी परत त्याच्या जवळ आलो. माझ्याजवळच्या पाण्याच्या बाटलीतून त्याला पाणी पाजले. पाणी पिऊन त्याला बरे वाटले असावे कारण त्याने आता ओरडणे कमी केले होते.  ते पिलू एकटक नजरेनं  माझ्याकडे पाहत होतं आणि मधून  मधून  ओरडत होतं . तो जीव कशाचा शोध घेत असावा याचा मनात विचार होता आणि त्याच्या परिस्थितीची मनाला कीव वाटत होती. पण यापेक्षा जास्त मी काही एक करू शकत नव्हतो.


मी दप्तर घेतलं आणि घरी जायला निघालो तर त्या पिलाने पुन्हा जोरात ओरडायला सुरुवात केली.   त्याला तसाच सोडून मला एकही पाऊल टाकवत नव्हते पण मनातील  भावनांना बाजूला ठेऊन  मी घरी जायला निघालो. काही पाऊल चालल्यावर तो ओरडण्याचा आवाज कमी झाला. मी कुतुहूल म्हणून माघे वळून बघितले तर काय ते पिल्लू माझ्या मागे मागे येत होते. मनात असूनही मी त्याला घरी नेऊ शकत नव्हतो. कारण आई-बाबाला असलं आवडत नाही. मी थांबलो परत वळलो, त्या लहानश्या जीवाला हातात घेतले. ते एकटक माझ्याकडे पाहत होते एका भावनेनं. ती भावना मदद मागत होती. त्याच्या प्रेमळ नजरेशी भिडलेली नजर हटवणे मला मुश्कील झालं होता. मी आणि तो असाच काही वेळ एकमेकांकडे पाहत होतो. 

मी त्याला घेऊन त्या लिंबाच्या झाडाखाली गेलो. त्याला अलगद खाली ठेवले आणि ५-१० मिनिटे तिथेच थांबलो. पुन्हा त्याला तिथे सोडून जायचं ठरवलं. फक्त या वेळेस पळत जायचं ठरवलं जेणेकरून ते पिल्लू माझा पाठलाग करू शकणार नाही. मी धावत सुटलो. थोडे दूर गेल्यावर परत मनानं साथ सोडली. मी मागे ओळून पाहिलं ते पिल्लू मंद पावलांनी माझ्या मागे येतंच होतं. पण मी त्याचा विचार न करता घरी जायचं ठरवलं. त्याच्यावरची नजर वळवून मी जायला निघालो पण तोच माझी नजर दगडाआड लपलेल्या आणि त्या पिलावर नजर ठेवलेल्या बोक्यावर गेली. मी पिलापासून बराच दूर होतो आणि बोका खूप जवळ होता. ते दृश्य पाहून भीतीची एक लहर अंगावर शहारे उमठून गेली. कसलाही विचार न करता मी एक गोटा उचलला आणि त्या बोक्याच्या दिशेने फेकला. नेम बसला, बोक्याच्या पाठीवर आणि बोका उडी मारून पळून गेला. मी त्या पिलाकडे धावत गेलो त्याला अलगद हातात घेतले आणि छातीशी लावले. माझ्या आसवांनाही त्या पिलाला पाहावस वाटलं म्हणून त्यांनीही डोळ्याचे बांध सोडले.  मी त्याला हातातच घेऊन बसलो होतो आणि तेही माझ्याकडे एकटक त्याच भावनेनं पाहत होतं. आणि तेव्हाच एक निश्चय केला कि या पिलाला आता कधी सोडून जायचं नाही. मनानं त्याचाशी मैत्रीचं नातं बांधलं.   हे नातं आता कधीच तोडायचं नाही. श्वास जोपर्यंत माझी साथ देतील तोपर्यंत या मित्राची साथ द्यायची. खरंच मैत्री कोणासोबातही होते, ती जात वा वंश विचारून कधीच होत नाही.


सूर्य आता मावळतीला चालला होता. भर उन्हांत एका पाखराशी माझी मैत्रीची गाठ बांधून तो सूर्य चालला होता. आयुष्यातल्या या अविस्मरणीय क्षणाला त्या भास्कराची साथ होती.त्या सूर्याचे मी आभार मानले. त्या पाखराने माझे हृदय चोरले होते म्हणून मी त्याला "हृदयचोर" नाव ठेवलं.

मी हृदयचोराला घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो आणि आहे त्या जागेवर देखील सोडून जाऊ शकत नव्हतो. काय करावे हा प्रश्न मला सतावत होता. शेवटी एक जागा सापडली, माझ्या अभीयांत्रिकीतल्या मित्राची रूम. त्या मित्राला पक्षांची खूप आवड होती. म्हणून मी हृदयचोराला घेऊन त्या मित्राच्या रूम वर गेलो. मित्राला घडलेलं सगळ सांगितलं आणि काही दिवस जोपर्यंत हृदयचोराला उडता येत नाही तोपर्यंत ठेऊन घ्यायला सांगितलं. तो लगेच तयार झाला. तो पण हृदयचोरासाठी वेद झाला होता. मित्राला तो खूप आवडला होता. आम्ही दोघे बराच वेळ मग हृदय्चोरासोबत खेळत बसलो होतो. तो इतर पाखरांपेक्षा वेगळाच होता, म्हणूनच तो मला इतका आवडला होता. आयुष्यात असा एखादा प्राणाहुनी प्रिय मित्र भेटावा यापेक्षा आनंदाची गोष्ट काय?  मग मी काही वेळ तिथेच थांबलो. बाजारातून हृदय्चोरासाठी टमाटे, मिरच्या, पेरू आणि डाळिंब घेऊन आलो. सुमारे रात्रीच्या ९ च्या आसपास मी घरी जायला निघालो. जाताना पुन्हा विचारांनी मनात गर्दी केली. हृदयचोर थांबेल ना इथे का परत मागे येईल? पण हृदय्चोराने  माझ्या मनातले समजलं वाटतं.  तो आला पण रुमच्या दरवाज्यापर्यंत मला सोडायला. मी निघालो आणि पुन्हा माघे ओळून पहिले. हृदयचोर वाकडी मान करून माझ्याकडे पाहत होता जणूकाही परत लवकर ये म्हणून मला सांगत होता.
मी तिथून घरी निघालो मनात हृदयचोराचे विचार घेऊन. घरी पोहोचलो, आईने चांगलीच विचारपूस केली. कुठे होतास? काय करत होतास? आणि थोडसे फटके. पण याचा काहीच परिणाम झाला नाही कारण मनात फक्त माझ्याकडे एकटक पाहणारे डोळेच  दिसत होते. आई  बाबाला  घडलेला प्रसंग सांगितला आणि नेहमीप्रमाणे ते म्हणाले कि प्राणी-बिनी काही एक घरात  आणू  नकोस . मला माहित होत हे म्हणूनच मी हृदयचोराला मित्राकडे ठेवलं. रात्रभर मनात त्याचेच विचार होते, तो ओरडत तर नसेल न म्हणून मनालाच जवाब विचारात होते. जर ओरडत असेल तर मित्राने काय केलं असेल? त्याला बाहेर तर नाही ठेवणार तो?बाहेर ठेवलं तर कुत्रे मांजरं...मला भीती वाटू लागली.  त्या बोक्याची आठवण आली आणि पुन्हा एकदा भीतीची लहर अंगातून गेली. कधी एकदा सकाळ होते आणि मी हृदयचोराला जाऊन भेटतो अस वाटत होतं.

सकाळ झाली, शाळेला निघायची तयारी केली. शाळेला जायला निघालो पण शाळेला गेलोच नाही. हृदयचोरासाठी पेरू घेऊन सरळ मित्राच्या घरी गेलो. मित्राने त्याला एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवले होते. मला आलेला पाहून हृदयचोर आनंदाने पिंजऱ्यात उड्या मारू लागला. मी त्याच्या जवळ गेलो, त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. त्यासाठी आणलेला पेरू त्याच्या समोर ठेवला, पण त्याच लक्ष पेरू कडे नव्हतंच. तो माझ्या मांडीवर येऊन माझ्या हाताला चोच रगडत होता. मी मग तिथेच थांबलो संध्याकाळपर्यंत. हृदयचोराला उडता येईपर्यंत माझं हे असं रोजचंच चालू होत. घरातून मित्राच्या घरी आणि वापस घरी. शाळेला काही दिवस रामरामच ठोकला होता.

असेच काही दिवस गेले, हृदयचोर मोठा झाला. त्याला उडता येऊ लागले. मग त्याला घेऊन मी फिरायला जाऊ लागलो दूरदूर जंगलात. कधी कधी तो मला घेऊन जात असे नवीन नवीन निसर्गरम्य ठिकाणी. तो झाडांवरची पिकलेली फळे पाडायचा मग आम्ही दोघे मिळून त्या फळांचा आस्वाद घ्यायचो. एका पक्ष्याच्या रुपात प्राणाहूनही प्रिय असा मित्र मला भेटला होता. मित्राने आणि मी हृदयाचोरासोबत खूप मजा केली.  काही दिवसानंतर मी त्याला घरी घेऊन गेलो. आता तो उडू शकत होता म्हणून मी त्याला पिंजऱ्यातून मुक्त केले. माझ्या घराला लागुनच एक झाड होते तिथे त्यासाठी एक जागा तयार केली. पण तो तिथे कमी माझ्या खोलीतच जास्त राहत असे. यासाठी कधीकधी मला आईचे बोलणे खावे लागत असे. पण त्याची मी कधी परवा केलीच नाही. नंतर नंतर आईबाबालाही त्याचं वेड लागलं. मग तो घरातच राहू लागला आमच्यासोबत.

एक दिवस तो मला फिरायला घेऊन गेला. ठिकाण काही लांब नव्हतं तरी आतापर्यंत कधी माझ्या नजरेसही आलेलं नव्हतं. ते ठिकाण निसर्गरम्य  तर होतंच पण त्याहूनही काही अधिक. विविध प्रकारची छोटी-छोटी, मोठी झाडे होती तिथे. कधी ना पाहिलेले पक्षी, झाडं, वेली,फुलं. सर्वकाही वेगळंच होतं तिथे. प्रत्येक क्षण असं वाटत होत कि आपण कोणत्या नवीन दुनियेत तर नाही ना आलो. मी विचारणार तरी कोणाला कि हि जागा कोणती आहे? हृदयचोराला तर बोलता येत नव्हतं तेव्हा. तरी मी त्याला सहज विचारलं, "अरे हृदयचोरा, हे कुठे घेऊन आलास मला? हि कोणती जागा आहे?" आणि तो चक्क पुटपुटला," मी तुला आता काही सांगणार नाही. पण एवढे  नक्की आहे कि आपली शेवटची भेट इथे होईल." मी त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही कारण मी फक्त त्याला बोलता येऊ लागलं या आनंदात होतो. तो आनंद गगनात मावत नव्हता. पण तेव्हाच एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम नंतर भोगावे लागले. नंतर कधी तो प्रश्न त्याला विचारावं हे माझ्या मनात नाही आलं. आणि त्या जागेच रहस्य जाणून घ्यायचंच राहिलं.

हृदयाचोराच्या मैत्रीत प्रत्येक क्षण मजेत गेला. तो प्रत्येक क्षण अविस्मरणीय  होता माझ्यासाठी. पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही. सकाळनंतर संध्याकाळ होते, दिवसानंतर रात्र होतेच . कोणतीही गोष्ट स्थायिक टिकून राहत नाही. आणि तेच झालं, हृदयचोर आजारी पडला. उडून आल्यावर तो खूप धापा टाकत असे, चोचेतून जीभ बाहेर काढून एका जागेवर तोल सावरत उभा असे. मी खूप उपचार केले पण काही एक फरक नाही पडला. त्याची हि अवस्था पाहून मी रडायचो. कशातही माझे लक्ष लागेना, माझ्या जिवलग मित्रासाठी मी काहीच करू शकत नाही याची खंत मनाला लागलेली असायची. काय करावे काहीच उमजेना. भिजलेल्या पापण्यांनी मी फक्त हृदय्चोराकडे पाहत बसायचो, त्याची देखभाल करायचो. "हृदयाचोरा, काय झालाय रे तुला सांगना? " पण तो काही सांगत नसे. नेहमी विषय बदलायचा. "मी गेल्यावर माझी आठवण काढशील ना मित्रा? "मला विचारायचा. हे ऐकून  त्याच्या पासून दुरावण्याची भीती वाटायची. "तुला नाही काही होणार. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू नेहमी माझ्याजवळ राहशील . मला वचन दे मला सोडून तू कुठेही जाणार नाहीस , दे वचन हृदय्चोरा. " पण तो निरुत्तर असायचा. सर्वकाही काळात असून देखील  मी वेड्या मनाला समजवायचो कि हृदयाचोर नेहमी माझ्या सोबत राहील.

एक दिवस तो असाच उडून आला, पण त्या दिवशी तो इतर दिवसांपेक्षा अधिक धापा टाकू लागला. माझ्याजवळ येताच तो कोसळला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. पायाखालची जमीन सरकली, असे वाटू लागले.मी अलगद त्याला हातात घेतले,त्या अवस्थेतही तो अल्पश्या नजरेतून माझ्याकडे पाहत होता त्याच भावनेनं. पण आज त्या नजरेतही थोडीशी भीती होती. त्याचा विरह मी सहन करू शकणार नव्हतो. त्याच्या पासून  दुरावण्याची कल्पना देखील मला करवत नव्हती. रडता रडता मीच हृदयचोराला विचारले," मित्र काय करू रे मी तूच सांगना? तुला कसा बरा करू ? सांगना?" आणि त्या अवस्थेतही तो पुटपुटला," तू...ला  अ..आठ..वतेय...क..क..का ते मैदान? ..ती..तिथे जे ..सग...ळ्यात उंच झाड आहे ना, त्या ....त्या झाडाच्या शे..शेंड्या...शेंड्याचा पाल...पाला घेऊन ये..." आणि तो बेशुद्ध झाला. मी लगेच पळत सुटलो त्या मैदानाकडे, धावताना पडलो, लागलं पण कशाचाही विचार केला नाही. त्याच्या भेटीपासून आतापर्यंतच्या  आठवणी डोळ्यांत  तरंगत होत्या. मैदानावर पोहचलो, ते उंच झाड लगेच दिसलं पण चढायला खूप कठीण होतं. त्यात मला झाडावर चढता येत नव्हतं. पण तरी कसाबसा चढलो, अर्ध्यापर्यंत पोहोचतो आणि तोच तोल गेला. मी कोसळलो, कोसळताना जोरात ओरडलो,"हृदयचोर ssss ....हृदयचोर ssss ."   

कोण जाने कसे त्याला माझा आवाज ऐकू आला. मी खाली पडल्यानंतर काही क्षणातच तो माझ्याजवळ आला. तो तसाच धापा टाकत होता पण माझी परिस्थिती पाहून  तो परत उडून गेला. काही वेळेनं तो परत आला, त्याने चोचीत एका झाडाचा पाला आणला होता. तो मला माझ्या जखमेवर लावायला सांगितला. त्याची परिस्थिती खूपच  हलाखीची  झाली होती, मला ती पाहवत नव्हती. पाला आणल्यानंतर तो परत जमिनीवर कोसळला. मन खूप बेचैन झाले होते. त्या वेळेला, त्या दुखाला व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. हृदयचोर परत बेशुद्ध पडला होता.त्याच्या पासून दुरावण्याची कल्पना मनाला भीती घालत होती. आता मी घाबरायला लागलो होतो, पण काही पर्याय नव्हता माझ्याकडे. 

त्याने दिलेला पाला मी जखमेवर लावला, जखम काही क्षणातच नीट झाली.  जखम इतक्या लवकर कशी नीट झाली हे कोडं मनाला उलगडलच  नाही. त्याला विचारावस वाटलं पण ती वेळ त्याला काही विचारण्याची नव्हती. त्याला काही न विचारण्याची हि दुसरी चूक केली.

काही वेळाने हृदयचोराला जाग आली. सर्व बळ  एकटवून तो उभा राहिला. त्या दिवशीप्रमाणे मी त्याला हातात घेतले. तेव्हा तो रडत  होता, आज मात्र शांत होता, मात्र डोळ्यांत तीच आत्मीयता दिसत होती. मी पण त्याला त्याच आत्मीयतेन पाहत होतो. हृदयचोर म्हणाला ," मला खाली ठेव." मी त्याला अलगद खाली ठेवले. तो पुढे म्हणाला," मित्रा बोलावणं आल आहे, जावे लागणार. तुला सोडून जावसं वाटत नाही रे, पण नियतीपुढे मी हतबल आहे.  तुझ्या  मनात नेहमी होतं कि मला विचारावं, मी कोठून आलो, हे मैदान कुटून आलं, जखम इतक्या लवकर कशी नीट झाली. पण तू कधी विचारलं नाहीस . याची उत्तर  तुला नक्कीच मिळतील . मी जात आहे तुला सोडून, प्राणाहून प्रिय मित्राला सोडून, आपली दोस्ती  अर्ध्यावर सोडून . तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर तुला भेटतील त्या लिंबाच्या झाडाखाली. तुझ्यासारखा मित्र मला भेटला हे माझं भाग्य समजतो. आपल्या भेटीपासून आतापर्यंत काही चुकले असेल  तर या हृदयाचोराला माफ करशील. तुला मैत्रीची साथ देऊ शकलो नाही रे म्हणून मला क्षमा करशील. तुझ्या मैत्रीचा मी नेहमी ऋणी राहील. मी जात आहे, मैत्री पूर्ण करता आली नाही म्हणून हा देह नष्ट करत आहे. आठवणीत जपशील. अलविदा. तुझा हृदयचोर."  आणि तो भुर्रकन उडून गेला. मी त्याला साद दिली पण त्याने काहीएक  नाही ऐकलं. हृदयचोर गेला, कधी न परतण्यासाठी.  मला एकट्यालाच सोडून गेला, आठवणी जपण्यासाठी. त्याच्याशिवाय नको वाटणारे जीवन जगण्यासाठी. ज्या क्षणांची कधी कल्पना देखील करवत नव्हती ते क्षण जगायला.

मी तसाच धावत  त्या लिंबाच्या झाडाखाली गेलो.  हृदयचोराचा इवलासा देह  तेथे निपचित पडला होता. मला प्रेमाने  पाहणारी नजर आज निपचित पडली होती.मी आल्यावर उड्या मारणारा  आज शांत झोपला होता.  त्याचा देह छातीशी धरून मी रडू लागलो. तो सोडून गेला आहे याची कल्पना देखील करवत नव्हती. त्याच्या आठवणींचे सर्व नजरे डोळ्यांसमोर तरंगू लागले. तो रडत असताना मी त्याला भेटलेलो, आणि आज मी रडत असताना तो मला सोडून गेला. नियतीचा वेडा खेळ समजलाच नाही. सूर्य तिथेच होता मावळतीवर, मैत्रीच्या या  विरहाला साथ देत.  हृदयचोराच्या देहाच्या बाजूला एक पत्रक, एक हृदयचोराचे तावीज पडले होते. मी पत्रक वाचू लागलो,
" मी आहे एक जादुगार राजा, माझ्या जगाचा. माझं जग आहे तुझ्या दुनियेच्या खूपखूप लांब. तुझ्या जगात आलतो मैत्रीसाठी. तुझ्या मैत्रीत जगलो याचा खूप आनंद आहे, पण जाताना तुझ्या डोळ्यांत अश्रू सोडून जावं लागलं याचं अतिशय दुःख  आहे. मला माफ करशील. मैत्री किती सुंदर नातं आहे हे मला समजलं. तुझी खूप आठवण येईल मला. तुझा विरह मला सहन नाही होणार. तरी मला जावं लागत आहे मित्रा तुला सोडून. माझी आठवण म्हणून मी तुझ्यासाठी  एक तावीज ठेवून जात आहे. जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल, या ताविजात बघ. तुला मी दिसेल, एक तुझ्या दुनियेतला आणि एक माझ्या दुनियेतला. स्वतःची काळजी घे . तुझा हृदयचोर. अलविदा."

मी ताविजात पहिले, तो जादुगार राजा, नाही माझा हृदयचोर माझ्या आठवणीत रडत होता. त्याच्या दुनियेत, त्याच्याजवळ सर्वकाही असूनही आज माझ्याशिवाय एकटा होता. मीपण त्याच्याशिवाय एकटाच राहिलो.           


लेखक: प्रशांत नागरगोजे (अशापुत्र )

follow my blog on http://shidori-prashu.blogspot.in/

shailesh0101

ek number.. ekdam hrudaysparshi !!  :)
fakt wachatach jaav asa watat hot ;) kip it up