निरोप

Started by Saee, June 13, 2012, 01:35:48 PM

Previous topic - Next topic

Saee

 वर मोकळे आकाश
त्यावर सावली नभाची,
कोसळणाऱ्या जलधारा,
देई चाहूल कुणाची?

थेंब थेंब मागून येई
लावी रीघ पावसाची
खाली जलाशय साठे
तृष्णा भागे अवनीची

अशा पावसात सये
मला आठव आठव
थेंबा थेंबातून प्रीती
माझी साठव साठव

जाई निघून पाऊस
थेंब पानात विसावे
आला गारवा कुठून
ओले चिंब झाड पुसे

अशा झाडाच्या पायाशी,
चल पुन्हा दोघे लपू
वरून निथळणारे थेंब
खाली लाजणारी तू

येता हवेची झुळूक
हले झाडाची पाती
झाडा, फुला पानांसावे
आपली प्रेमाची नाती

गेली पावसाची सर
शांत आसमंत झाला
पुन्हा अंतराने माझ्या
सूर प्रीतीचा छेडला

मज स्मरे कसा होय
जळून जळून मी राख
थेंब तुला स्पर्श करी
आणि येई मला राग

आता सांगतो पाण्याला
कोसळणाऱ्या पावसाला
आधी तीच्या गावा जाऊन
मग माझ्या भेटीला या

मला सांगा तिचे क्षेमं
सुखी आहे ती म्हणा
मला आठवते ती तीला
माझा निरोप कळवा

केदार मेहेंदळे