चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!....(गझल)

Started by janki.das, July 08, 2012, 03:38:46 PM

Previous topic - Next topic

janki.das


कोणते नाते कुणाशी?... आठवावे लागते!
चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!


माणसे न्याहाळताना आरश्याला कैकदा....
'चेहरा की मुखवटा' हे पारखावे लागते!


फक्त पाढे घोकुनी, सुटते कुठे अवघड-गणित?
दु:ख-दु:खाने, सुखासाठी गुणावे लागते!


खुंटते काही कुणाचे सांग का कोणा विना?
श्वास येतो, श्वास जातो अन् जगावे लागते!


यंत्रवत् उरले जरी नाते तुझ्या- माझ्यातले...
बोलण्याचे तंत्र दोघांना जपावे लागते!


सद-विचारांची कितीही मंथने केली तरी...
सूर ना जुळता स्वतःशी गुण-गुणावे लागते!


सात फेरे मारल्याने प्रेम का जडते 'प्रिया'?
योग्य साथी लाभण्या 'युग-युग' झुरावे लागते!


-- सुप्रिया (जोशी) जाधव.


Vaishali Sakat

Superb Supriya........"खुंटते काही कुणाचे सांग का कोणा विना?
                                  श्वास येतो, श्वास जातो अन् जगावे लागते!" Mastach Yaar.........