रोजचे जगणे जसे की व्यर्थ हे प्रवास झाले ............

Started by SHASHIKANT SHANDILE, October 22, 2026, 03:25:18 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

रोजचे जगणे जसे की व्यर्थ हे प्रवास झाले,
जीवनाशी झुंज होता सुख आता भास झाले!

वादळे लोटून आली शांत जी आताच होती,
थांब देवा जीवनाचे हे पुरे अभ्यास झाले!

रोजचे नैराश्य हाती मी तरीही शांत आहे,
जिंदगीला वाटते की दुःख माझे खास झाले!

एकट्याचे युद्ध माझे एकटा आधार माझा,
जोडले मी हात देवा हात ते उदास झाले!

वैर थोडेफार असले पण कुणाचा राग नाही,
एकदाची जिंदगी ही वैर आता बास झाले!

डोंगरावर एकटा मी स्वप्न माझे सोबतीला,
अडचणीच्या जिंदगीचे पूर्ण हे वनवास झाले!

एकटा दिसलो तरीही सोबती 'एकांत' आहे,
मी जयांना प्रेम केले ते कुणाचे दास झाले!
*************
शशिकांत शांडिले (एकांत), नागपूर
मो.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!