प्रतिक्रिया

Started by प्रशांत नागरगोजे, September 02, 2012, 07:24:21 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

प्रतिक्रिया म्हणजेच FEEDBACK. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात काही विचार निर्माण होतात, तेव्हा ते विचार मनात न ठेवता त्या गोष्टीबद्दल उद्गारने अथवा लिहून सांगणे म्हणजे प्रतिक्रिया.
तर या विषयावर लिहिण्याचं कारण काय? काय होतं समाजात वागत असताना बरेचदा आपल्याभोवती अनेक घटना घडतात किव्हा काही गोष्टी आपण वाचतो, ऐकतो. आता यातील काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही आवडत नाहीत. आणि बरेचदा असे दिसून येते की जरी एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडली अथवा नावडली, तरीसुद्धा आपण तिच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, जरी याला काही मिनिटांचा कालावधी लागत असला तरी.
पण जर नाहीच व्यक्त केल्या प्रतिक्रिया तर फरक पडतो का? हो, फरक पडतो. चला एक उदाहरण घेवूया. समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की त्याला गाणे गायला चांगलं जमते, तर सुरुवातीला त्याला याचा खूप आनंद असतो आणि मग तो त्याच्या मित्रांना/नातेवाईकांना/शेजाऱ्या-पाजार्यांना गाणे म्हणून दाखवतो. आता इथे आपण दोन गोष्टींचा विचार करू. पहिली, त्याच्या गाण्याला त्याचे मित्र/शेजारी  वगेरे नावाजतात, त्याची प्रशंक्षा करतात, तो अजून चांगले गाऊ शकतो असे सांगतात. याचा एकंदरीत परिणाम असा होतो, आपला हा गायक अजून चांगल्या पद्धतीने कसे गाता येईल याचा विचार करतो आणि प्रगती करतो. आता दुसऱ्या बाजूचा विचार करू, समजा गाणे ऐकणाऱ्या मंडळीपैकी कोणीच आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, तेव्हा गायकाला असे वाटते की आपण चांगले गाऊनही कोणीच काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याचा असा समज होतो की त्याच्या गायनाला तितकासा वाव नाही, आणि इथे त्याचे मनोधैर्य खचते. जर लोकांना आपण गायिलेलं आवडत नाही तर का गावं? असाही तो विचार करतो.
असं बरेचदा घडतं, घरातही, जेव्हा घरातील लहान मंडळी आई-बाबांना सांगतात की,"बाबा, बघाना मी किती छान चित्रं काढली आहेत." पण बाबा प्रशांक्षा करण्याऐवजी म्हणतात,"तुझं वय चित्र काढायचं नाहीये अभ्यास करायचं आहे, जा अभ्यास कर आणि ती चित्र-फित्र काडायची सोडून दे." मग, काय होतं, एक चित्रकार हरवला जातो.
म्हणून म्हणतो मित्रहो, प्रतिक्रिया करत जा. आता तुम्ही म्हणताल फक्त चांगलीच प्रतिक्रिया करायची का? मग त्याला काय अर्थ आहे, जर एखादी गोष्ट आम्हाला नाहीच आवडली तर नाही का सांगायचं मग? का नाही सांगायचं, जरूर सांगायचं पण जरा वेगळी पद्धत वापरायची. समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट का वाईट आहे हे न सांगता ती गोष्ट कशी चांगली वाटेल हे सांगावे. "अरे असं करू नकोस, असे कर." जर यापद्धतीने सांगितले तर नक्कीच याचा फायदा होईल. आणि काय माहित, तुमच्या एखाद्या प्रतिक्रियेतून एखाद्याच्या जीवनाला चांगले वळण/गती मिळाले तर त्याच्या आयुष्यात तुम्ही सदासाठी स्मरणीय रहाल, एक वाट दाखवणारा दिवा म्हणून....

                                                                                                             -आशापुत्र
www.prashu-mypoems.blogspot.com

atulmbhosale


प्रशांत नागरगोजे

धन्यवाद अतुलजी... :)