बालपण....

Started by tanmay20, October 26, 2012, 07:27:55 PM

Previous topic - Next topic

tanmay20

असं वाटतं कशाला आलं हे तरुणपण , कुणी तरी परत द्या मला माझं बालपण

फार आठवते,
हा घास चिऊचा, हा घास काऊचा करत भरवणारी ती आईची माया
सायकल शिकवताना मागे मागे धावणारी ती बाबांची छाया

दगड मातीने प्रत्येक दिवाळीत बांधलेले ते शिवाजीचे अभेद्य किल्ले
जमा केलेले ते ड्युक्स आणि गोल्डस्पोट कोल्डड्रिंकचे इवलेशे बिल्ले

धुरांच्या रेषा हवेत काढीत मामाच्या गावाला नेणारी ती झुकझुक गाडी
क्रिसमसला सॉक्स मध्ये चॉकलेट ठेवून जाणारी सांताक्लोजची ती सफेद दाढी

तीन चार टप्पे पाडत पाण्यावर फेकलेली ती चपट्या दगडाची टप टप
पाय आपटत पावसाळ्यात काढलेली ती काळ्या गमबूटाची चप चप

भयाण वाटणारा तो पायथागोरस थिओरेम आणि ती गणिताची वही    
घाबरत घाबरत प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची ती खोटी सही

अवघड गेलेलं ते संदर्बासह स्पष्टीकरण आणि इंग्रजीतलं व्याकरण
खेळात आउट होत असता "टाइमप्लीज" ओरडत केलेलं ते राजकारण

पार्कमधील आकाशाला भिडणारा तो झोका आणि पत्र्याची ती घसरगुंडी
लवकर झोपलं नाही तर बागुलबुवाच्या धाकाने उडलेली ती घाबरगुंडी

बाईंच्या हातातली रप रप लागणारी ती वेताची छडी
पहिल्या चेंडूत आउट होताच " ट्रायलबॉल " म्हणत केलेली ती क्रिकेट मधील रडी

दर रविवारी सकाळी भेटणारा तो मोगली आणि दूरदर्शनवरील ते छायागीत
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? हे तोंडपाट असलेलं ते बडबडगीत

खरंच, कशाला आलं हे तरुणपण
हरवलं त्यात मी माझं निरागस बालपण
                                                                    ... तन्मय सिंगासने