पैज लावून मधु हरे

Started by प्रसाद पासे, November 13, 2012, 07:03:35 PM

Previous topic - Next topic

प्रसाद पासे

पैज लावून मधु हरे अन शर्कराही लाजते
का तुझ्या ओठांस काळी मुंगीदेखील चावते

तीळ का हे राखणीला नेमक्या जागी असे?
नजर ना पोचे तिथेही दृष्ट का तुज लागते ? (!)

उगवताना कोर चंद्राची तुला बघुनी म्हणे
तू घरी लपुनी रहा, संसार मग मी थाटते!

पावसाळी वय असे अन घाट देहाचा तुझ्या
चाल दमाने, वळण धोक्याचे मला मन सांगते!

चिंब तू होता पडे ठिणगी, उडे चकमक अशी
जाळतो पाऊस तुजला, पावसा तू जाळते!

आग प्रेमाची कधी ना एकतर्फी वागते
जळतसे तोही जळे अन जाळत्याही जाळते!

भांग तिरपा, नजर तिरपी, वृत्तीही तिरपी अशी
सरळ रस्त्यावरसुद्धा ती नागमोडी चालते!

का बरे इतक्या दिसांनी पाहुनी हसलीस तू!
सांग, कारस्थान हे कुठले नव्याने घाटते ? (!) 

संदीप खरे