बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

- वसंत बापट

MK ADMIN

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे

जयांना कोणी ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल,
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी,
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे,
जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे,
जगाला प्रेम अर्पावे

- साने गुरुजी

MK ADMIN

देवाचे घर

इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी

निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी


- ग. दि. माडगूळकर

MK ADMIN

जरा अस्मान झुकले

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !

- ना. धो. महानोर

MK ADMIN

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडति जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!

- भा. रा. तांबे

MK ADMIN

मंथर नाग

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

कुसुमाग्रज

MK ADMIN

ती फुलराणी .......

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती, फ़ुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचल त्या भृलीला, अवगत नव्ह्त्या कुमारीकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फ़ुलराणीला?

पूरा विनोदी संध्यावात, डोल दोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फ़ुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतुन, हळूच पहाते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला?"
लाज लाजली ह्या वचनांनी, साधी भोळी ती फ़ुलराणी

आंदोळी संध्यच्या बसूनी, झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टॊणा त्यांनी केला, चैन पडेन फ़ुलराणीला
निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फ़ुलराणी ही, आज कशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फ़ुलराणीला

या कुंजातून त्या कूंजातून, इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्न्संगमी दंग होऊन
प्रणय चींतनी विलीन वॄत्ती, कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनि, स्वप्ने पाही मग फ़ुलराणी

कुणी कुणाला अवकाशांत, प्रणयगायनें हॊतें गात;
हळूच मागुनि आले कॊण, कुणी कुणा दे चुंबनदान??
प्रणय खेळ हे पाहुन चित्तीं, विरहार्ता फुलराणी हॊती;
तॊं व्यॊमींच्या प्रेमदेवता, वार्‍यावरती फिरतां फिरतां-
हळूच आल्या उतरुन खालीं, फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनीं, त्या वदल्या ही अमुची राणी?

स्वर्भुमीचा जुळवित हात, नाच नाचतो प्रभात वात
खेळूनी दमल्या त्या घ्रह माला, हळुच लागती लपावयाला
आकाशाची गंभिर शांति, मंद मंद ये अवनी वरती
विरू लागले संशय जाल, संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्ल्याचे वस्त्र लेऊनी, हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्न्संगमी रंगत होती, तरीही अजुनि फ़ुलराणी ती,

तेजोमय नव मंडप केला, लक्ख पांढरा दाही दिशांना,
जिकडे तिकडे उधळित मोती, दिव्य वर्हाडी गगनी येती,
ला सुवर्णी झगे घालूनी, हासत हासत आले कोणी,
कुणी बांधिला गुलाबि फ़ेटा, झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोल चालला, हा वाड्निश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फ़ुलराणीचे,

MK ADMIN

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


- नारायण सुर्वे

MK ADMIN

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


- ग. दि. माडगूळकर

MK ADMIN

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे ?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा


- इंदिरा संत