बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

देवाचे घर

इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी

निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी


- ग. दि. माडगूळकर

MK ADMIN

झुक झुक झुक गाडी

गाडी आली, गाडी आली झुक झुक झुक
शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक
ईंजीनाचा धुर निघे भक भक भक
चाके पाहू तपासूनी ठक ठक ठक
गाडीमध्ये चढा सारे चट चट चट
गाडीमध्ये बसा चला पट पट पट
तिकिटाचे पैसे काढा छन छन छन
गाडीची ही घंटा वाजे घण घण घण
नका बघू डोकाउन शुक शुक शुक
गाडी आता निघालीच झुक झुक झुक

-(कवी माहीत नाही)

MK ADMIN

माझ्या छकुलीचे डोळे

माझ्या छकुलिचे डोळे, दुध्या कवडीचे डाव
बाई! कमळ कमळ, गोड चिडीचं ग नांव!
जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई, खडीसाखरेचे खडे!
सर्व जगाचं कौतुक, हिच्या झांकल्या मुठीत
कुठें ठेवूं ही साळुन्की, माझ्या डोळ्याच्या पिंजर्‍यात
कसे हांसले ग खुदकुन, माझ्या बाईचे हे ओंठ
नजर होईल कोणाची, लावुं द्या ग गालबोट!

- वि. भि. कोलते

MK ADMIN

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट

- वसंत बापट

MK ADMIN

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

MK ADMIN

कणा

?ओळखलत का सर मला?? - पावसात आला कोणी..,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी....

क्षणभर बसला, नंतर हसला... बोलला वरती पाहून
?गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन?...

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
?पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा?!

- कुसुमाग्रज

MK ADMIN

तळ्याकाठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!

-- अनिल

MK ADMIN

झुळुक

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

- दामोदर कारे

MK ADMIN

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

-वि. म. कुलकर्णी

MK ADMIN

अ आ आई

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

- मधुसूदन कालेलकर