बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण

- बा. भ. बोरकर

MK ADMIN

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

-बा. भ. बोरकर.

MK ADMIN

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा श्रुभ शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
? अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ?

.........कुसुमाग्रज

MK ADMIN

या बाई या...

या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया......१

ऐकून येते,
हळुहळु अशि माझी छबि बोलते.......२

डोळे फिरवीते,
टुकु टुकु कशी माझी सोनि बघते......३

बघा बघा तें,
गुलुगुलु गालांतच कशी हंसते......४

मला वाटते,
हिला बाई सारें काही सारे कळते......५

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे वळते......६

शहाणी कशी!
साडिचोळी नवी ठेवि जशिच्या तशी......७

कवि: दत्तात्रय कोंडो घाटे

MK ADMIN

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे।

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलावर उडती फुलपाखरे॥

-अ. ज्ञा. पुराणिक

MK ADMIN

बाळ जातो दूर देशा

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासुन
हात लागेना कामाला, वृत्ति होय वेडयावाणी
डोळ्यांचे ना खळे पाणी
आणा दूध जिन्सा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला
त्याच्या आवडीचे चार, करू पदार्थ सुंदर
कांही देऊ बरोबर
त्याचे बघा ठेविले कां, नीट सामान बांधून
कांही राहील मागून
नको जाऊ आतां बाळा, कुणा बाहेर भेटाया
किती शिणविसी काया
वार्‍यासारखी धांवते, वेळ भराभरा कशी!
गाडी थांबेल दाराशी
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस
उंच भरारी घेवुन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी
बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
बाळ जातो दूर देशा, देवा! येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला!

-गोपीनाथ

MK ADMIN

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll

- वसंत बापट

MK ADMIN

क्रूस

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी क्रुसावरचे
विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष -
"प्रेम, शांति अन् क्षमा यांमध्ये वसतो परमेश! "
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत
निःशस्त्रांच्या रक्तामांसामध्ये नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलांबायकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तीप्रद रीत!
पाचोळ्यापरी पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास!
असेल ही बा सैतानाची प्रभुवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजात!

- कुसुमाग्रज

MK ADMIN

प्रेम कर भिल्लासारखं

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!

- कुसुमाग्रज

MK ADMIN

घाटातील वाट,
.


घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ.

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती.

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा.

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी.


कवयित्री - सरिता पदक