कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

shashaank

 मी तिला विचारलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं...

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं...

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं


कवी - मंगेश पाडगांवकर

shashaank

 प्रेमात पडलं की असंच व्हायचं
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर,
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते
अखेर ती उगवते !

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही,
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी
तिच्यासोबत भुलत जायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


एकच वचन
कितीदा देतो आपण
एकच शपथ कितीदा घेतो आपण ?

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात;
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


कवी - मंगेश पाडगावकर

मिलिंद कुंभारे

#102
वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २    १  २  २    १  २  २    १  २  २


पहाटे पहाटे मला जाग आली

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली ॥धृ.॥

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली ॥१॥

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली ! ॥२॥

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली ! ॥३॥

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

गीत :सुरेश भट

krishnakumarpradhan

अष्टा्क्षरी-नवकविची ही व्यथा
अशी कशी छंदोमयी
करणार मी कविता
धडपड चालू राही
जोवरी चंद्र सविता.
अक्षरे मोजकी हवी
एक ना जास्त वा कमी
शब्द उलटेपालटे
कसेही करणे चाले.
सीमित अक्षरा भावे
असे शब्द निवडावे
अर्थास त्यातुनी घ्यावे
कसेतरी समजोनी.
भाव मुके ती कविता
नैसर्गिकता नुरता
लागते असे बोलाया
कविंनो,तुम्ही का वीता?--krishnakumar pradhan

मिलिंद कुंभारे

#104
"पहाटे पहाटे मला जाग आली" ह्या कवितेवरून सुचलेली आणि पहिल्यांदाच वृत्तात लिहिलेली कविता ...
एक प्रयत्न .... त्रुटी आढळल्यास अवश्य कळवा .... तसेच दुरुस्तीही सुचवा ......

वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २     १  २  २     १  २  २     १  २  २

ऋतू प्रेमरंगी

मला आठवेना, तुला आठवेना
कशी  कोण जाणे, कधी भेट झाली ......

कशी सांज आली, कधी रात झाली
कळेना जराही, मलाही तुलाही ......

नभी चांदण्यांची, किती आज गर्दी 
सखी ये जराशी, अशी बाहुपाशी......

अता सोसवेना, दुरावा जराही
सखी सांजवेळी, जरा घे उभारी ......

नको साथ सोडू, अश्या सांजवेळी,
नको बंध तोडू, ऋतू प्रेमरंगी......

तुझा ध्यास सखये, किती प्रीत न्यारी
कळेना तरी, का मना वेड लावी ???

मिलिंद कुंभारे



sweetsunita66

वृत्त ,वगैरे काही कळत नाही मला पण तुमची शब्दांची गुंफलेली माळ फार आवडली बुआ आपल्याला !!खूप खूप अभिनंदन !!!!

मिलिंद कुंभारे

#106
शशांक,
पहिल्यांदाच गझल लिहिलीय, एक प्रयत्न, जमलीय का ते सांगा ....
वृत्त : देवप्रिया  ( गा ल गा गा ... गा ल गा गा ...गा ल गा गा ...गा ल गा )

अंतरीची वेदना

रोजच्या स्वप्नात माझ्या, येउनी जातेस तू
आसवांचा प्रांत मागे, सोडुनी जातेस तू ......

बांध माझ्या भावनांचा, फोडुनी जातेस तू
अंतरीच्या वेदनांना, छेडुनी जातेस तू ......

सांजवेळी तारकांना, पेटवुन जातेस तू
काळजाशी घाव ओला, ठेवुनी जातेस तू ......

सागराच्या वादळाला, झेलुनी जातेस तू
रंगलेला डाव सारा, मोडुनी जातेस तू ......

रेशमाच्या बंधनाला, तोडुनी जातेस तू
श्वास माझा गुंतलेला, रोखुनी जातेस तू ......

मिलिंद कुंभारे


shashaank

मला गजलचे तंत्र माहित नाही पण उत्तम गजलियत असेल तर गजल आवडतेच. हे एक उदाहरण.

स्टेशन

(- शाम )

दोन सुखाच्या घासांवरही भागत असते
कुठे जिंदगी इतके सारे मागत असते

ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते

तुला द्यायचा आहे तर दे स्वर्ग असा की
गरिबीचेही जेथे हसून स्वागत असते

इतकी येते याद कुणाला माहेराची
लागे चटका किंवा भाकर डागत असते

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते

वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते

माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते

'शाम' बदलल्या इथल्या माणुसकीच्या व्याख्या
दुनिया हल्ली पैसा बघून वागत असते

- शाम




मिलिंद कुंभारे


shashaank

अजून एक जबरदस्त गजल ...

किनारा

(-पुलस्ति)

श्रद्धा जुनीच आहे, ईश्वर जुनाच आहे
दररोज माणसांचा गोंधळ नवाच आहे

भेटायला कधीही, ये जीवना इथे मी
होतो तिथेच आहे, होतो तसाच आहे

जागून रात्रभर मी बसतो जिच्या उशाशी
ती आठवण तुझी अन, मीही तुझाच आहे

या नेहमी असू द्या गाठीस चार कविता
गाठायचा तुम्हाला पल्ला बराच आहे

हे विश्व, हे पसारे; हे स्थूल सूक्ष्म सारे
सगळे खरे, जरी हे सगळे उगाच आहे

सरला प्रवास, आला अर्धाच शेर हाती
आयुष्य एक मिसरा, तोही उलाच आहे

याहून सोसवेना आता मला किनारा
ही लाट वाट पाहे; क्षण हाच, हाच आहे

-पुलस्ति